राष्ट्रवादी पार्टीचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र ते खरचं भाजापात जाणार की नाही याबाबत काहीसा संभ्रमही आहे. आता याच पार्श्वभूमीवर व कदाचित आपाला अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांनी ‘मला तुमच्याशी काही बोलायचे आहे’ अशी कार्यकर्त्यांना फेसबुकच्या माध्यमातून भावनिक हाक दिली आहे. शनिवार ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर परिसंवादाचे आयोजन केले आहे. त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय शनिवारीच होणार असल्याची शक्यता आहे.

मागील महिनाभरापासून राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याची जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ही चर्चा आता माध्यमांपर्यंतही पोहचलेली असून त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे. तर आमदार राणाजगजितसिंह यांनी नुकतेच राज्य शासनाच्या अनेक चांगल्या गोष्टींचे कौतुकही केले. शिवस्वराज्य यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात आली असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील हे वाशीच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले होते. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाटील घराण्याचे नाव न घेता टीका केली होती. यासर्व घडामोडी पाहता त्यांच्या भाजपमधील प्रवेशांच्या शक्यतांना अधिकच बळकटी मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवार, १ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत येणार आहे. तर संध्याकाळी सोलापुरात जाणार आहे. या यात्रेचा समारोप सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोलापूर येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील अनेक आमदार व नेते भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती भाजपा पदाधिकार्‍यांनी दिली आहे. या मेगाभरतीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनाही भाजपची मनसबदारी मिळणार की नाही, याचेही उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, पाटील यांनी फेसबुकवर कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली असून हा परिवार संवाद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या मेळाव्यात ते कोणावर तोफ डागणार की अन्य एखादा मोठा निर्णय जाहीर करणार याकडे कार्यकर्त्यांच्या नजर लागल्या आहेत.