आघाडीचा मार्ग मोकळा, पण..

मुंबई : समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारी समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्याच वेळी राहुल गांधी हाच काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल हेही स्पष्ट करण्यात आल्याने आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला राहुल यांचे नेतृत्व मान्य करावे लागणार आहे. नेमके हे राष्ट्रवादीला मान्य होणार का, हा प्रश्न आहे.

मध्य प्रदेशातील पंचमढी येथे १९९८ मध्ये झालेल्या अधिवेशनात काँग्रेस पक्षाने आघाडीबाबत विरोधी भूमिका घेतली होती. पण २००४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पंचमढी ठरावात बदल करून आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. २०१९च्या निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आघाडी करण्यावर भर दिला आहे. पक्षाचा एकूणच घटता जनाधार लक्षात घेता समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा राज्य काँग्रेसने तत्त्वत: निर्णय घेतला असला तरी त्याला दिल्लीची मोहोर उठणे आवश्यक आहे. काँग्रेस कार्यकारी समितीने आघाडीबाबत अनुकूल मत व्यक्त केल्याने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यात काही अडथळे येणार नाहीत, असे राज्य काँग्रेसमधील नेत्यांचे म्हणणे आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा काँग्रेसचा चेहरा असेल, यावर काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

काँग्रेसने यापूर्वीच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल, असे जाहीर केले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, १९७७चा दाखला देत नेतृत्वाविना निवडणूक झाली होती याकडे लक्ष वेधले होते. तसेच निकालानंतर नेतृत्वाचा प्रश्न सोडविता येईल, असे मत व्यक्त करीत पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे विरोधच केला होता. राष्ट्रवादी नेतृत्वाचा राहुल गांधी यांना असलेला विरोध लपून राहिलेला नाही. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल, असे जाहीर केल्याने आघाडी केल्यास राष्ट्रवादीला राहुल यांचे नेतृत्व मान्य करावे लागेल.