सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज असून, महाराष्ट्रातही महायुती झाली पाहिजे असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशात जिंकण्यासाठी सपा आणि बसपाची साथ मिळणं गरजेचं असून भारतीय जनता पक्षानेही नेहमीच कोणाची तरी साथ घेतली आहे असं शरद पवार बोलले आहेत. आजतकच्या मुंबई मंथन कार्यक्रमात ते बोलत होते.

कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असं सांगताना राजकारणात युतीनेच देश चालतो असं शरद पवार बोलले आहेत. सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी बहुमत ज्यांना जास्त असेल त्यांना संधी देण्यात येईल असं स्पष्ट केलं. तुम्ही पंतप्रधान होण्यास इच्छुक आहात का असं विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला.

राजकारणात पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, तेव्हाच 50 वर्ष राजकारण करता येईल असं उत्तर देताना मला अपघाती राजकारणात सहभागी होण्याची इच्छा नाही असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला दुर्लक्षित करु शकत नाही असंही सांगितलं.

राफेल विमानावरुन मोदींचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर बोलताना मीडियामध्ये जागा भरण्यासाठी वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, राफेल चांगलं विमान आहे, आम्ही या विमानाची पाहणी केली होती. राफेल एक चांगलं विमान आहे या विधानावर मी आजही ठाम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

राफेलच्या किंमतीवरुन लोकांच्या मनात संशय आहे. हा संवेदनशील विषय असल्याने या विषयावर जास्त बोलू शकत नाही. मात्र किंमतीत इतका फरक पडू शकत नाही असं शरद पवार बोलले आहेत. राहुल गांधी राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत असल्याच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधींचे माझ्यापेक्षा जास्त चांगले संपर्क असावेत असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.

वरिष्ठ पदावरील अधिकाऱी आरोप करत असताना नरेंद्र मोदी शांत का बसलेत…त्यांनी यावर आपलं म्हणणं मांडलं पाहिजे असं मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलं. मोदी लोकांचं नाही तर फक्त स्वत:चं म्हणणं ऐकतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपा फक्त दोनच लोक चालवतात. त्यांच्याकडे टीम आहे, मात्र त्यांच्याकडे क्षमता नाहीये. टीममधील लोकांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. सर्व निर्णय पीएमओमधून होतात त्यानंतर मंत्र्यांना कळवतात असं शरद पवारांनी म्हटलं आहे.