मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

 नागपूर : माहिती व तंत्रज्ञानामध्ये राज्य अग्रेसर असूनही त्यासंदर्भातील विषय हाताळण्यासाठी स्वतंत्र विभाग नाही. त्यामुळे भविष्याची निकड लक्षात घेता राज्य सरकार स्वतंत्र माहिती व तंत्रज्ञान विभागाची स्थापना करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विभागाची स्थापना झाल्यानंतर तात्पुरत्या स्तरावर विभागाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, लातूर येथे आयटी पार्क आहेत. त्यातून मोठय़ा प्रमाणात सॉफ्टवेअरची निर्यात होते. शिवाय सध्याचे माहिती व तंत्रज्ञानाचे युग असताना राज्यात स्वतंत्र विभाग नसून ते भविष्यात स्थापन करणार का, असा प्रश्न शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे नागोराव गाणार यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आजवर माहिती व तंत्रज्ञानासंदर्भातील सर्व व्यवहार सामान्य प्रशासन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनायाद्वारे करण्यात येत होते. त्याशिवाय एमआरएसएससी विभागाद्वारे माहिती तंत्रज्ञानाचे काम केले जाते. भविष्यातील निकड लक्षात घेऊन स्वतंत्र विभाग स्थापण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने माहिती व तंत्रज्ञान विभाग स्थापण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते अस्तित्वात येईल. सुरुवातील अर्थ व सांख्यिकी विभागातून नवीन विभागाचे काम चालणार असून ते मंत्रालय प्रथम मुख्यमंत्र्यांकडेच असेल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.