News Flash

‘इकडे आड तिकडे विहीर’ अवस्था झालेले मुख्यमंत्री आता तरी काही बोलणार का…? – भाजपा

आता बऱ्याच जणांची पोलखोल होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संग्रहीत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज(सोमवार) मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली होती. अखेर आज अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया न आल्याने, भाजपाने आता मुख्यमंत्र्यांवर टीका करणे सुरू केलं आहे. मुख्यमंत्री अजूनही गप्प का? असा सवाल भाजपाकडून केला जात आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“सचिन वाझे यांचे प्रकरण बाहेर आले, तेव्हाच ते दिसते तितके साधे नाही, असे भाजपा नेत्यांनी सांगितले होते. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहेच. ‘इकडे आड तिकडे विहीर’ अवस्था झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी काही बोलणार काय…? गृहमंत्र्यांचे कैवारी आता कुठे गेले? आता तर देशमुखांनी राजीनामा सुद्धा दिला. ‘तो लादेन आहे का’ असं म्हणून वाझेची पाठराखण करणारे मुख्यमंत्री अजूनही गप्प का?” असं भाजपाने विचारलं आहे.

“…अखेर सीबीआयला घाबरून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला”

तसेच, “भाजपा निःपक्ष चौकशीचीच मागणी करत होतं. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी न्याय मिळणं शक्य नव्हतं. शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील सांगितलं, मात्र गृहमंत्री राजीनामा देणार का हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर ठरणार होतं. पण, मुख्यमंत्री मौनच का ?” असं केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे.

“कोर्टानं CBIचौकशी लावल्यानं महाविकास आघाडीचा नाईलाज झाला आणि अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. पण तोवर सगळं आल-बेल असल्याचंच भासवण्यात आलं. सरकारचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी मौन सोडून या विषयावर काही बोलणार का? आता बऱ्याच जणांची पोलखोल होणार. “कशिही फसवणूक सेना कायद्याचीही बूज राखेना…”, मुख्यमंत्री कधी मौन सोडणार?” असा टोला देखील भाजपाने लगावला आहे.

अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया

याचबरोबर , “अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री ‘हप्ता वसूली’ करताना पाहिलं.” असं ट्विट केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेलं आहे.

स्वतःचा जावई ड्रग्स प्रकरणात पकडला गेला आणि नवाब मलिक थेट सचिन वाझे आणि गृहमत्र्यांना वाचवायला निघाले होते. एवढी घोडदौड करून, मुलाखती, पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला काय मिळालं ? अखेर सत्य बाहेर आलंच ! असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर देखील भाजपाने निशाणा साधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 6:59 pm

Web Title: will the chief minister say anything now bjp msr 87
Next Stories
1 “…अखेर सीबीआयला घाबरून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला”
2 कोल्हापूर : ३० एप्रिलपर्यंत अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर भाविकांसाठी बंद; जोतिबा यात्राही रद्द
3 तोतया रूग्ण बनून चार तरुणांचा डॉक्टरवर जिवघेणा हल्ला
Just Now!
X