News Flash

शेतकरी विरोधी लोकांना मतदान करणार का?

कांद्याच्या किमती वाढल्या म्हणून गळय़ात माळा घालून लोकसभेत कांद्याच्या निर्यातबंदीची मागणी करणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी

| March 27, 2014 04:00 am

कांद्याच्या किमती वाढल्या म्हणून गळय़ात माळा घालून लोकसभेत कांद्याच्या निर्यातबंदीची मागणी करणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पारनेर येथे झालेल्या प्रचार सभेत केला.
नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी येथील बाजारतळावर आयोजित सभेत पवार बोलत होते. पालकमंत्री मधुकरराव पिचड, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार यशवंतराव गडाख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार बबनराव पाचपुते, राजीव राजळे, अरुण कडू, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार नंदकुमार झावरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, अशोक सावंत आदी या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले, पीक कर्जाचे दर ३ टक्क्यांवर आणले, ८० हजार कोटींचे कर्जवितरण ७ लाख कोटींपर्यंत वाढवले. शेतीमालाचे भाव वाढविण्याची भूमिका घेण्यात आली, त्यामुळेच देशात विक्रमी धान्य उत्पादन होऊ लागले. जगातील १८ देशांना भारताकडून अन्नधान्य निर्यात होते. त्यातून देशाला २ लाख ३२ हजार कोटींचे परकीय चलन मिळाले. तांदूळ, कापूस, साखर तसेच गहू निर्यातीमध्ये देशाचा प्रथम क्रमांक असून देशातील ६७ टक्के लोकांना अल्पदरात अन्नधान्य पुरविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुपोषण, भुकेचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. शेतीमालाचे भाव वाढू लागल्यानंतर भाजप व त्यांचा मित्रपक्षांनी या भाववाढीस लोकसभेत विरोध केला. त्यासाठी दंगा घातला. कृषिमंत्री या नात्याने विरोधकांची ही मागणी आपण फेटाळून लावत शेतकऱ्यांना आधार दिला. शेतीमालाचे भाव वाढल्यावर त्यास विरोध करणाऱ्यांच्या हाती तुम्ही सत्ता देणार का, असा सवालही त्यांनी केला.
राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, राजीव राजळे यांचीही भाषणे झाली. बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी स्वागत केले, तर संचालक सोन्याबापू भापकर यांनी सूत्रसंचालन केले.
घोषणाबाजीला आवर
पवार यांनी माजी आमदार वसंतराव झावरे तसेच नंदकुमार झावरे यांचा विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी असा उल्लेख करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याच वेळी वसंतराव झावरे व सुजित झावरे यांच्या घोषणांना प्रारंभ झाला. त्या वेळी सुजित झावरे यांच्याकडे कटाक्ष टाकत अरे सुजित, तुझ्या समर्थकांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या, त्यांना शांत कर असे पवार यांनी सुनावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 4:00 am

Web Title: will vote for anti farmers people
टॅग : Parner
Next Stories
1 सुशीलकुमारांकडे २३.४७ कोटींची मालमत्ता
2 अंतुले एकाकी पडले..
3 लोखंडेंच्या उमेदवारीवर शिवसेना ठाम!
Just Now!
X