जिल्ह्य़ात वादळी पावसाच्या तडाख्याने तिघांचा बळी गेला असून रावेर तालुक्यात विवरे येथे अंगावर झाड कोसळल्याने महिलेचा, तर भडगाव तालुक्यात बंधाऱ्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. पावसामुळे रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात केळी पिकाचे कोटय़वधीचे नुकसान झाले आहे.
महिन्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने संपूर्ण जिल्ह्य़ात सोमवारी सायंकाळी हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.  रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे आठवडे बाजारात फुटाणे विक्री व्यवसाय करणाऱ्या जनाबाई लाला ढोले (६०) यांच्या अंगावरच वृक्ष कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
लाला ढोले आणि वसंत सुरवाडे हे दोघे या वेळी जखमी झाले. भडगाव तालुक्यातील शिवानी येथील रवींद्र नाथ (४०) हे मुलगा दीपक (१९) यांसह शेतातील  बाजरी कापण्यासाठी गेले होते.
काम आटोपून परतताना दीपक हातपाय धुण्यासाठी देवळी बंधाऱ्याजवळ गेला असता पाय घसरून पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी रवींद्र नाथ यांनीही पाण्यात उडी मारली. पण दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही बुडाले. दरम्यान, पावसामुळे रावेरसह पातोंडा, सावदा, उचंद, विवरे, विवरे बुद्रुक आदी शिवारातील केळीसह कापूस व ज्वारी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.