अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आलेल्या वादळी पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे अलिबाग किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे. रेवस-करंजाची लाँच बुडाली आहे. तर याच परिसरातील मासेमारी बोटींचेही नुकसान झाले आहे.
परतीच्या पावासाने उग्र रूप दाखवायला आता सुरुवात केली आहे. वादळी वारे, विजांच्या गडगडाट आणि पाऊस अशा तिहेरी आपत्तीला बुधवारी अलिबागकरांना तोंड द्यावे लागले आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात सरासरी २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात पोलादपूर येथे ४२ मिमी, माथेरान -४० मिमी, उरणमध्ये ३८ मिमी, माणगाव- ३२ मिमी, महाड- ३० मिमी, पेण -२६ मिमी तर अलिबाग येथे २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या गडगडाटाने अलिबाग किनारपट्टीवरील भागात नुकसान झाले आहे.
रेवस ते करंजादरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँचला या वादळामुळे जलसमाधी मिळाली आहे. रात्री उशिरा अचानक आलेल्या वादळामुळे लाँच किनाऱ्याला आपटून फुटली होती. गुरुवारी पहाटे ती बुडाली. यामुळे रेवस ते करंजादरम्यान चालणारी प्रवासी लॉँचसेवा बंद पडली आहे. त्यामुळे दैनंदिन ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. आता पर्यायी बोट उपलब्ध होत नाही तोवर ही लॉँच सेवा बंद पडण्याची शक्यता आहे. लाँचसेवा तातडीने सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. दरम्यान आवास, बोडणी, मिळकतखार परिसरातील मासेमारी बोटींचेही वादळी पावसाने नुकसान झाले आहे. तर आवास परिसरातील काही घरे, गोठे आणि दुकानांची छप्परेदेखील उडाली असल्याची माहिती आवासचे सरपंच अभिजीत राणे यांनी दिली.
जिल्हा प्रशासन वादळाबाबत अनभिज्ञ
अलिबाग परिसरात वादळामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले असले तरी जिल्हा प्रशासन वादळाबाबत अनभिज्ञ आहे. पत्रकारांनी वारंवार विचारपूस करूनही कुठलीही माहिती रिपोर्ट झाली नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. तर बुडालेली लाँच हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतला विषय असल्याने याबाबत माहिती नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून सांगण्यात आले.