धवल कुलकर्णी

सोमवारपासून म्हणजेच आजपासून राज्यातील वाईन शॉप्स उघडले आहेत. मात्र मद्यविक्रीचा व्यवसाय करणं हे व्यावसायिकांना तेवढं सोपं जाणार नाही. याबाबत महाराष्ट्र वाईन मर्चंटचे दिलीप गीयानानी यांनी लोकसत्ता ऑनलाइनला प्रतिक्रिया दिली आहे. ” सध्या वाईन शॉप्समध्ये पंचवीस दिवस ते महिनाभर पुरेल इतका मद्यसाठा मात्र एखाद्या शौकिनाला एखादा विशिष्ट ब्रांड हवा असेल तर त्याच्या उपलब्धतेची शक्यता कमी आहे. महाराष्ट्रातील वाईन शॉप्स मागचे ४५ दिवस बंद होते त्यामुळे ही अडचण येऊ शकते” असं त्यांनी सांगितलं आहे.

इतकंच नाही तर वाईन शॉप्स उघडणाऱ्यांपुढे इतरही काही प्रश्न आ वासून उभे आहेत. कारण वाईन मर्चंट असोसिएशनच्या सदस्यांकडूनच काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत असंही गीयानानी यांनी स्पष्ट केलं.

काय आहेत वाईन शॉप्स मर्चंट्स पुढचे प्रश्न?

सुमारे ४५ दिवसांनी दुकानं उघडली आहेत त्यामुळे इथे येणारे ग्राहक शिस्त पाळतील का?

सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच विशिष्ट अंतर पाळलं जाईल का?

सध्या प्रचंड तणावात असलेली पोलीस यंत्रणा वाईन शॉप्सच्या बाहेर पुरेसा बंदोबस्त राखू शकेल का?

“हे प्रमुख प्रश्न वाईन शॉप्सचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पडले आहेत. इतकंच नाही तर वाईन शॉप्समध्ये काम करणारी मुलं लांबच्या अंतरावरुन येतात. मात्र लोकल ट्रेन्स बंद असल्याने ते दुकानांपर्यंत कसे पोहचणार? हादेखील प्रश्न आहेच. काही वाईन शॉप्स कमी क्षेत्रफळ असलेली आहेत. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंग कसं पाळणं तितकं सोपं नाही. गरज पडल्यास वाईन शॉप्सच्या मालकांना दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भाडे तत्त्वावर एखादी जागा घेऊन त्यांची राहण्याची सोय करावी लागू शकते. अशा जागेत राहताना समजा एखाद्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली तर काय करायचं ? हे आणि असे अनेक प्रश्न वाईन शॉप व्यावसायिकांनी उपस्थित केले आहेत” असं दिलीप गीयानानी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वाईन शॉप्स उघडली तरीही अनेक समस्या या व्यवसाय करणाऱ्यांना भेडसावू शकतात ही स्थिती आत्ता तरी आहे.