महाराष्ट्र सध्या थंडीने गारठला असून, सर्वत्र भरलेला प्रचंड गारवा..बोचणारा थंडगार वारा.. त्यापासून बचावासाठी चाललेली धडपड..असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत सलग दुसऱया दिवशी पारा घसरला असून, गुरूवारी राज्याच्या राजधानीत सकाळी ११.४ अंश तापामानाची नोंद झाली. त्यामुळे एरवी घामाच्या धारांनी ओथंबळणारे मुंबईकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
मुंबई कुडकुडली..!
नाशिकमध्ये तर गेल्या दोन दिवसांपासून यंदाच्या मोसमातील निच्चांकी पारा गाठण्याचा विक्रम रचण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. निफाडमध्ये बुधवारी ६ अंशांवर घसरलेले तापमान आज ५.६ अंशांवर गेले आहे. या तापमानासह निफाड हे राज्यातील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाचे ठिकाण ठरले आहे.
नाशिकमध्ये थंडीचा मुक्काम
एरवी, तापमान कमी होणे आणि थंडीची लाट येणे नाशिककरांना नवीन नाही. दर वर्षी जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यांत तापमान या पातळीवर जात असते. तथापि, चार वर्षांनंतर डिसेंबर महिन्यात प्रथमच पारा इतका खाली घसरला. वातावरणाचा बदललेला नूर नववर्ष स्वागताच्या तयारीत उत्साह भरणारा आहे. तिथे धुळ्यात देखील पारा ७.८ अंशांवर घसरला आहे, तर नंदुरबार, औरंगाबादमध्येही तापमान कमी झाले आहे.