सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रत्यक्षात फक्त ९ दिवसांचे कामकाज होणार असल्याने एवढय़ा कमी कालावधीत परस्परांची पुरेपूर कोंडी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. अधिवेशनासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बहुतांश मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुभाष देसाई, बाळा नांदगावकर यांच्यासह प्रमुख विरोधी नेते नागपुरात मुक्कामी दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राजकीय कुरघोडीची रणनिती रंगू लागली असून सिंचन श्वेतपत्रिकेला जबाब देण्यासाठी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकतानाच रविवारी काळी श्वेतपत्रिका जारी करून संघर्षांची पहिली ठिणगी पाडली.
सोमवारी माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या दिवंगत नेत्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली अर्पण करून विधिमंडळाचे कामकाज स्थगित केले जाईल. सत्ताधारी आणि विरोधकांचा सामना खऱ्या अर्थाने मंगळवारपासून रंगणार आहे. विरोधकांचे प्रमुख लक्ष्य सिंचन घोटाळा आणि मंत्रिमंडळात पुनरागमन झालेले अजित पवार हेच राहणार असून या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना अद्याप अन्य खातेवाटप झालेले नाही. दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांच्यानंतर ऊर्जा खात्याचा कारभार अजित पवार यांच्याकडे आला होता. वीज खरेदीच्या मुद्यावरून चव्हाण-पवार यांच्यात बरीच तणातणी झाली होती. त्यामुळे अजितदादांना पुन्हा ऊर्जा खाते देण्यात आल्यास ऊर्जा प्रश्नांच्या मुद्दय़ावरून अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसकडूनच छुपी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. सिंचन घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. विरोधकांनी मागणी लावून धरल्यास एसआयटी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री करू शकतात, असे संकेत मिळाले आहेत.
यावेळचेअधिवेशन सिंचन घोटाळ्यावरून सरकारवर झालेले आरोप प्रत्यारोप, शेतक री आत्महत्यांचे वाढते प्रमाण, विजय पांढरे यांचे पत्र, श्वेतपत्रिकेत घोटाळ्याचा उल्लेख नसणे, बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कमधील स्मारकाच्या जागेचा वाद, इंदू मिलचे हस्तांतरण, फेसबुक प्रकरणात दोन तरुणींवर कारवाईची घिसडघाई, ऊस उत्पादकांचे हिंसक आंदोलन, आझाद मैदानाबाहेर विशिष्ट धार्मिक नेत्यांनी उन्मादात घडविलेला नियोजित हिंसाचार या मुद्दय़ाभोवती प्रामुख्याने फिरणार आहे. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनीही सिंचन घोटाळ्यावर आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेने अविश्वास ठरावाची तयारी केली असली तरी भाजपला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आल्याने भाजपही संभ्रमात आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात येणार असून त्यानंतर शिवसेनेच्या रणनितीला नवे वळण मिळू शकते.