लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून, करोनाबाधितांच्या एकूण संख्येने दीड शतकाचा उंबरठा गाठला आहे. एकाच परिवारातील पाच जणांसह १० नव्या रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज, शनिवारी सकारात्मक आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १४७ वर पोहोचली असून, आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२१ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात करोनाचे वाढते संक्रमण थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यातील एकूण १३८ तपासणी अहवाल शनिवारी प्राप्त झाले. त्यापैकी १२८ अहवाल नकारात्मक, तर १० जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १४७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १४ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १२१ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांपैकी पाच जण एकाच परिवारातील आहेत. ते माळीपुरा येथील रहिवासी आहेत. जुने शहरातील एक जण व बाळापूर तालुक्यातील कांचनपूर येथील एक रुग्ण आहे. सकाळच्या अहवालात सकारात्मक आलेल्या दोन्ही महिला रुग्ण असून, एक खैर मोहम्मद प्लॉट येथील ५० वर्षीय महिला आहे. दुसरी खंगनपूरा येथील २६ वर्षीय रुग्ण आहे. त्या महिलेची जिल्हा स्त्री रुग्णालयात नुकतीच प्रसुती झाली होती. अन्य एक रुग्ण वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथून पाठविण्यात आला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून युद्धस्तरावर सुरू आहे. जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

ग्रामीण भागातही प्रसार
अकोला शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही करोनाचा प्रसार होत आहे. आज बाळापूर तालुक्यातील कांचनपूर येथील एक रुग्ण आढळून आला. या अगोदरही ग्रामीण भागातून रुग्ण आढळून आले आहेत. शहरात गत १२ दिवसांपासून सतत रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात अद्यापही यश आलेले नाही. शहराच्या विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत असून, तो परिसर प्रतिबंधित केला जात आहे. समूह संक्रमणामुळे शहरातील रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली.