दिवाळी आणि दिवाळी अंक यांचं एक वेगळं नातं आहे. दिवाळी आली की दिवाळी अंक घरी आणण्याची एक परंपराच महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये आहे. यावर्षी मात्र करोना आणि लॉकडाउन यांचा परिणाम दिवाळी अंकांवरही झाला आहे. दरवर्षी दिवाळी आली की त्याआधी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. मात्र १०० प्रकाशनांनी दिवाळी अंक छापलेच नाहीत. तर अनेक दिवाळी अंकांनी त्यांची पानं कमी केली आहेत. करोना आणि लॉकडाउन या दोन्हीमुळे जाहिराती मिळाल्या नाहीत. त्यामुळे पृष्ठसंख्येत घट झाल्याचंही दिसून येतं आहे. त्यामुळे मराठी वाचक अनेक दर्जेदार दिवाळी अंकांना मुकले आहेत.

असं असलं तरीही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही की दिवाळी अंक काही प्रमाणात परदेशातही विकले गेले आहेत. दिवाळी अंकांची ही परंपरा १०० वर्षांपेक्षाही जुनी आहे. अनेक घराघरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आणि पिढ्या न् पिढ्या हे अंक आणले जात आहेत. जेव्हा बच्चेकंपनी फटाके, किल्ला तयार करणे, फराळ या सगळ्यांमध्ये गुंतलेली असते तेव्हा मोठी माणसं आपला वेळ दिवाळी अंक वाचण्यात घालवतात. दिवाळी अंकांमधून आरोग्यविषयक, स्त्रियांच्या प्रश्नांविषयी विपुल लेखन केलं जातं. तसंच व्यंगचित्रं, अर्कचित्र, विनोद यांचीही रेलचेल असते. त्यामुळे दिवाळी अंक आणि मराठी माणूस हे नातं अतूट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मात्र यावर्षी करोनाचा गंभीर परिणाम दिवाळी अंकांवरही झाला आहे. दिवाळी अंकांचं काम हे शक्यतो एप्रिल-मे महिन्यात सुरु होतं. मात्र त्या काळात आपल्याकडे कठोर लॉकडाउन होता. तसंच वितरकांनीही अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दिवाळी अंकांच्या प्रकाशनावर परिणाम झाला आहे.

यावर्षी करोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे वसंत, शतायुषी यांच्यासह १०० पेक्षा जास्त जणांनी त्यांचा अंक आणला नाही किंवा ज्यांनी त्यांचा दिवाळी अंक आणला त्यांची पृष्ठसंख्या कमी होती अशी माहिती दिवाळी अंक विक्रेते आणि गिरगावच्या बी. डी. बागवे एजन्सीचे मालक हेमंत बागवे यांनी दिली.