राज्याच्या दूध उत्पादनात अग्रस्थान पटकावणारे येथील गोकुळ दूध संघाने एका दिवसात १३ लाख ६० हजार लिटर्स दूध विक्रीचा नवा उच्चांक नोंदवला असल्याची माहिती शनिवारी देण्यात आली.
गोकुळने (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. दररोजच्या दूध संकलन व विक्रीत वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने एक दिवसाच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित करताना १३ लाख ६० हजार लिटर्स दूध विक्री केली आहे. गतवर्षी याच दिवशी म्हणजे ईदच्या दिवशी १२ लाख ७७ हजार लिटर्स इतकी दूध विक्री एका दिवसात नोंदविली होती. त्या तुलनेत यंदा ८३ हजार लिटर्सने वाढ झाली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. सध्या गोकुळचे सरासरी दूध संकलन ८ लाख लिटर इतके आहे. ते २०२१ पर्यंत २० लाख लिटर्स करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गोकुळच्या दूध संकलनाबरोबरच विक्रीमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे मूल्यवृध्दी होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा दूध उत्पादकांना जादा दराच्या माध्यमातून करून देण्यास कटिबध्द असल्याचे पाटील यांनी नमुद केले.