वातानुकूलित डब्यातून प्रवास करण्याचे तिकीट काढूनही ढेकणांचे सान्निध्य लाभल्याने संतप्त महिला प्रवाशांनी यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस रोखण्याचा प्रकार घडला. केवळ गाडी थांबवूनच या महिला शांत झाल्या नाहीत तर अख्खा वातानुकूलित डबा अधिकाऱ्यांना बदलण्यास भाग पाडले. यामुळे तीन तास विलंबाने ही गाडी रवाना झाली.
यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस यशवंतपूर स्थानकातून सुटल्यानंतर हुबळीपर्यंत येण्याच्या अवधीत द्वितीय श्रेणीच्या डब्यामध्ये ढेकणाच्या त्रासाने महिला त्रस्त झाल्या होत्या. बर्थवर आणि खिडक्यांना लावण्यात आलेल्या पडद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात ढेकणे असल्याने त्या महिला हैराण झाल्या होत्या. प्रवाशी महिलांनी या संदर्भात डब्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. याबाबत हुबळी स्थानकावर निर्णय घेण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले.
तथापि, ढेकणाचा त्रास वाढल्याने दोन वेळा महिला प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. हुबळी स्थानकावर कोणतीही उपाययोजना न करता गाडी पुढे सोडण्याचा प्रयत्न लक्षात येताच महिलांनी गाडी रोखून जोरदार हंगामा केला. अन्य सहप्रवाशांनीही महिलांच्या तक्रारीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तक्रारीची दखल घ्यावी लागली. द्वितीय श्रेणीची वातानुकूलित बोगीच हुबळी स्थानकावर बदलण्यात आली. यामुळे गाडीला तीन तासांचा विलंब झाला.