स्वत:ची इमारत असणाऱ्या अंगणवाडय़ाच आदर्शठरणार

शुन्य ते सहा वयोगटातील बालकांच्या भौतिक, शारीरिक व सर्वागीण विकासाच्या दृष्टिकोनातून आदर्श अंगणवाडी योजनेची मुहूर्तमेढ रोवली असली तरी राज्यातील एकूण एक लाख ८ हजार ३४४ पैकी स्वत:ची इमारत असणाऱ्या केवळ ६८ हजार अंगणवाडय़ांची त्या योजनेंतर्गत निवड झाली आहे. म्हणजे उर्वरित ४० हजार ३४४ अंगणवाडय़ांना स्वत:ची इमारतदेखील नाही. त्यातील कित्येक अंगणवाडय़ा जागा नसल्याने भाडेतत्त्वावरील जागेत, मंदिराचा ओटा किंवा गावच्या मोकळ्या पटांगणात भरतात. ज्यांना स्वत:ची इमारत आहे, त्यातील ५३ हजार ८६८ अंगणवाडय़ांना विद्युत पुरवठा नाही. ज्यांना वीज आहे, त्यांना भारनियमनामुळे अडचणींना तोंड द्यावे लागते. या स्थितीत अंगणवाडींना सौर ऊर्जेवर आधारित संच देऊन एलईडी टीव्ही, यूएसबी पोर्ट व पेन ड्राइव्हसह ‘ई लर्निग’ साहित्य देण्याचे नियोजन आहे.

महिला व बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकाससेवा योजना राबवते. त्या अंतर्गत अंगणवाडी केंद्रात सेविकांच्या मदतीने बालकांचा सर्वागीण विकास करण्यासाठी पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी व शिक्षण, औपचारिक शिक्षण सेवा पुरविल्या जातात. ५५३ एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांमध्ये राज्यात ९७ हजार २६० अंगणवाडी केंद्र आणि ११ हजार ०८४ मिनी अंगणवाडी केंद्र अशी एकूण एक लाख ८ हजार ३४४ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो बालकांची धुरा दोन लाख अंगणवाडी सेविका व चार हजार मुख्य सेविका सांभाळतात. या अंगणवाडीचे रूपांतर आता आदर्श अंगणवाडीत करण्यात येणार आहे. मुलांना आनंददायी वातावरणात पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार दिला जाईल. वर्षभर रखडलेल्या योजनेची चालू वर्षांत अंमलबजावणी होत असून पहिल्या टप्प्यात पाच हजार अंगणवाडय़ा आदर्श गटात रूपांतरित करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने अंगणवाडय़ांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये वाढ केली जाईल. स्वत:च्या इमारती असणाऱ्या अंगणवाडय़ांचा विचार केल्यास त्या सर्व आदर्श बनण्यात किमान १४ वर्षांचा कालावधी लोटणार असल्याचे लक्षात येते.

या निमित्ताने राज्यातील अंगणवाडय़ांच्या स्थितीवर खुद्द शासनाने प्रकाश टाकला. ग्रामीण भागात रडतखडत होणारा वीजपुरवठा मान्य झाला. यामुळेच निवडलेल्या अंगणवाडीत वीज पुरवठय़ासाठी ०.५ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा संच दिला जाईल. सध्या केवळ १४ हजार १३२ अंगणवाडी केंद्रांत वीजपुरवठय़ाची सुविधा आहे. भार नियमनामुळे तिथेही अडचणी येणार असल्याचे गृहीत धरून सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला गेला. आनंददायी वातावरणासाठी अंगणवाडी इमारत प्राणी, फळे, फुले आदी चित्रांनी रंगवून ती शैक्षणिक मदत केंद्र म्हणून तयार करण्यात येईल. एलईडी टीव्ही व तत्सम सामग्री देऊन ई-लर्निग साहित्य पुरविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ३० मुलांसाठी टेबल व खुच्र्या, प्रत्येकाला स्वच्छ भारत किट (साबण, हातरुमाल, टिश्यू पेपर, कंगवा, पाण्याची बाटली) उपलब्ध केली जाईल. जेणेकरून बालपणापासून स्वच्छतेच्या सवयी रुजवता येतील. शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी वीज विरहित पाणी शुद्ध करणारी यंत्रणा (वॉटर प्युरिफायर), मुलांसह गर्भवती मातांचे नियमित वजन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मुलांची उंची मोजण्यासाठीची साधने देण्यात येणार आहे. यामुळे कुपोषित मुले व माता पहिल्या टप्प्यात लक्षात येतील. त्यांना योग्य आहाराचा पुरवठा करता येईल. कुपोषणावर मात करण्याचा विचार करण्यात आला आहे. आदर्श अंगणवाडी बनण्याचे भाग्य प्रत्येक जिल्हय़ातील केवळ १४४, प्रत्येक विभागातील ८३३ अंगणवाडय़ांना लाभणार आहे. आदर्श अंगणवाडी योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकल्पाला जिल्हा व राज्यस्तरावर रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात येईल. परंतु, या योजनेंतर्गत जागा नसलेल्या अंगणवाडय़ांचा कोणताही विचार झालेला नाही.

सुविधांमध्ये दुजाभाव

स्वत:ची इमारत असलेल्या ६८ हजार अंगणवाडय़ांची आदर्श अंगणवाडय़ांसाठी निवड करण्यात आली. उर्वरित ४० हजाराहून अधिक अंगणवाडय़ांना स्वत:ची इमारतदेखील नाही. त्यातील काही भाडेतत्त्वावरील जागेत तर काही मंदिराचा ओटा, मोकळी जागा व तत्सम ठिकाणी भरतात. या योजनेंतर्गत जागा नसणाऱ्या अंगणवाडय़ांना किमान जागेची उपलब्धता करण्याचा विचारही झाला नसल्याची तक्रार अंगणवाडी सेविकांनी केली. तेथील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे आनंददायी वातावरणात बालकांना पूर्वशालेय शिक्षण देताना एक प्रकारे दुजाभाव निर्माण होणार असल्याच्या मुद्दय़ावर काही सेविकांनी बोट ठेवले.

मंदिर ओटापार..

नाशिक जिल्हय़ाचा विचार करता सद्य:स्थितीत ग्रामीण भागात चार हजार ७७६ तर नाशिक शहरात १६७ अंगणवाडय़ा आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील अंगणवाडय़ांची बिकट स्थिती आहे. ९५३ वर्गाना अद्याप स्वतची इमारत व जागा नाही. यामुळे ८०९ वर्ग हे भाडय़ाच्या खोलीत भरतात तर १४४ वर्ग हे मंदिराच्या ओटय़ावर, गावातील पारावर, ग्रामपंचायतीच्या आवारात किंवा गावात एखाद्या मोठय़ा झाडाखाली भरतात. मोकळ्या आवारात हे वर्ग भरत असल्याने बालकांना बदलत्या ऋतुमानाला तोंड द्यावे लागते. त्यात काही बालके आजारी पडत असल्याने गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. राज्यातील इतर भागांत यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याचे जाणकार सांगतात.