सी डॉप्लर रडार पोहचण्यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घेता येऊ शकतो का, याची चाचपणी सोमवारी सकाळी अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञांसमवेत केली जाईल. त्यानंतर हा प्रयोग तातडीने करण्याचा निर्णय घेऊ, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले. पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथे आलेल्या विमानातही कमी क्षमतेचे एक रडार असते, त्याआधारे प्रयोग करता येऊ शकेल, असे दिवसे म्हणाले.
फसलेला प्रयोग असे वर्णन नेहमीच कृत्रिम पावसाच्या बाबतीत केले गेले आहे. मात्र, अन्य कोणताच मार्ग शिल्लक नसल्याने हा प्रयोग करण्याचे ठरविण्यात आला. अमेरिकेतील कंपनीला कंत्राट देऊन हा प्रयोग हाती घेण्यात आला. त्यासाठी विभागीय आयुक्तालयावर सी डॉप्लर रडार बसविण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, ही यंत्रणा अद्यापि अमेरिकेतच असल्याने हा प्रयोग कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर पुढे ढकलले जात होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात प्रयोग हाती घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अमेरिकेतील हवामानशास्त्रज्ञ औरंगाबाद येथे रविवारी दाखल झाले आहेत.