एफआरपी कायद्यात सुधारणा केल्याशिवाय साखर कारखाने सुरु ठेवणे अवघड असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. या कायद्यात साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक या दोघांच्या हिताचा सुवर्णमध्य साधून योग्य तो बदल केला जाणार असल्याची हमीही त्यांनी दिली. राज्यात आपल्या पक्षाच्या सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतरही खानदेशातील उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात अपयश आल्याची खंतही खडसे यांनी व्यक्त केली.

शहादा तालुक्यातील सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्यात दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वयंचलीत ‘सायलो’ यंत्रणेचे रविवारी खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खडसे यांनी साखर कारखाने चालविण्यात येत असलेल्या विविध अडचणीवर प्रकाशझोत टाकत कमी किमतीत अधिक उत्पादन घेण्यासाठी साखर कारखान्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची गरज व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे होणाऱ्या परिणामांमुळे साखरेचे उत्पादन अधिक असले तरी भाव मिळत नसल्याने साखरेची उचल होत नाही. परिणामीे साखर उद्योग अडचणीत येत आहे. त्यातच एफआरपी कायदा साखर कारखानदारीस अनुकूल नसल्याने कारखाने चालविणे अवघड झाले आहे. उसाची आधारभूत किंमत, प्रक्रिया खर्च यांची गोळाबेरीज करता साखरेच्या सध्याच्या बाजारातील किंमतीपेक्षा उत्पादन खर्चच अधिक येत असल्याने साखर कारखाने रसातळाला जात आहेत. त्यामुळेच आगामी काळात एफआरपी कायद्यात सुधारणा करण्यासाठी सर्वपक्षीय नेतेही आग्रही असल्याचे खडसे यांनी नमूद केले.
तालुक्यातील पाटीदार समाजाच्या मंगल कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात खडसे यांनी मंत्रिमंडळाच्या कामकाजाबद्दल खंत व्यक्त करत एका वर्षांत काही महत्वाची कामे होत नसल्याचे नमूद केले. यापूर्वीच्या युती सरकारमध्ये खडसे जलसंपदा मंत्री असताना बांधण्यात आलेल्या तापी नदीवरील वेगवेगळ्या लघु प्रकल्पांमधील (बॅरेज) तब्बल पाच टीएमसी पाणी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित नसल्याने पोहचु शकलेले नाही. अवघ्या ४७ कोटीचा खर्च अपेक्षित असलेल्या या योजनांच्या पुनरूज्जीवनाचा कार्यक्रम रखडल्याने खडसे यांनी असमाधान व्यक्त केले. पुढील तीन महिन्यात या उपसा सिंचन योजना टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी खडसे यांनी महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाचे कौतुक केले. या कार्यक्रमात खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्या आग्रहास्तव खास त्यांचे माहेर असलेल्या शहादा शहरासाठी त्यांनी अल्पसंख्याक विभागातून १०० मुलीची क्षमता असलेले वसतीगृह साकारण्याची घोषणा केली.