News Flash

‘खात्री केल्याशिवाय पोलिस खबऱ्यांना ठार करू नका’

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाला मिळालेल्या नक्षलवादी साहित्यातून ही माहिती समोर आली आहे.

नक्षलवादी नेत्यांचे आदेश;  संशयावरून सहा महिन्यात १३ आदिवासींची हत्या

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गेल्या सहा महिन्यांत १३ आदिवासींची हत्या केली असली तरी यापुढे एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असेल तर सखोल परीक्षण करून आणि संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच शिक्षा करावी असे आदेश वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांनी दलम कमांडर व उपकमांडरला दिले आहे. मात्र, या आदेशाचे दंडकारण्यातील नक्षलवादी किती पालन करतात,  याबाबत औत्सुक्य आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस दलाला मिळालेल्या नक्षलवादी साहित्यातून ही माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी दंडकारण्यात आजवर शेकडो आदिवासींची हत्या केवळ पोलीस खबऱ्या आहे, या एका कारणावरून केली आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासींमध्ये नक्षलवाद्यांप्रती असंतोष वाढत चालला आहे. नक्षलवादी येतात आणि आदिवासी आणि दलितांनाच ठार करतात असा एक समज झालेला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत तर नक्षलवाद्यांनी केवळ दलितांनाच लक्ष्य केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांविरुद्ध लोक बोलायला लागले आहेत.

कोरची तालुक्यातील एका गावात तर नक्षलवाद्यांनी दोन कुटुंबांना मध्यरात्री घरातून बाहेर काढून तीन किलोमीटर पायपीट करायला लावली. ही घटना माध्यमांमध्ये येताच नक्षलवाद्यांच्या अमानवी कृत्याचीच चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घटना बघता आता पोलीस खबऱ्या असल्याची पक्की माहिती मिळाल्याशिवाय आणि शहानिशा केल्याशिवाय कुणालाही ठार करू नये किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देऊ नये, असे नक्षलवादी नेत्यांनी फर्मान काढले आहे. विशेष म्हणजे शिक्षा देण्यापूर्वी त्या व्यक्तींना समजावून सांगावे, त्यांना ताकीद देणे व लोकांमध्ये प्रचार करणे आवश्यक असल्याचेही नक्षलवादी नेत्यांनी म्हटले आहे.

दलम कमांडर व उपकमांडरने दंडकारण्यातील आदिवासी व दलितांमध्ये दहशत निर्माण होईल अशा प्रकारे शिक्षेचा अंमल करणे त्वरित थांबवावे.

देशशुध्दी ठरविलेल्या प्रमाणापेक्षा जास्त करू नये असेही यात म्हटले आहे. स्थानिक लोकांमध्ये विरोध होणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी, असेही यात म्हटले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांशी योग्य प्रकारे व्यवहार करावा तसेच यासंबंधीचे ज्ञान अधिक वाढवून घ्यावे, दूरदृष्टीकोनातून व्यवहार करावे असाही उल्लेख या साहित्यात करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे सखोल परीक्षण व संपूर्ण माहिती काढल्यानंतरच शिक्षा देण्याचा विचार करावा, अन्यथा शिक्षा करू नये असाही यामध्ये उल्लेख आहे.

स्थानिक आदिवासींमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात भावना तीव्र होत असल्यामुळेच नक्षलवाद्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागत आहे. त्याला कारण आजही दंडकारण्यात नक्षलवाद्यांची भीती कायम असली तरी बहुसंख्य गावांनी नक्षलवाद्यांना रसद पुरविणे बंद केल्यामुळे आणि नक्षलविरोधात सूर उमटायला सुरुवात झाल्यामुळेच नक्षलवादी संघटना आता अभ्यासपूर्ण पध्दतीने आणि लोकांची मने समजून काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:20 am

Web Title: without information do not kill police informer naxal leader
Next Stories
1 रोहयोतील विशिष्ट कामांना यंत्र वापराची परवानगी
2 राज्यातील पावसाचा जोर कमी होणार, पुणे हवामान खात्याने वर्तविला अंदाज
3 पंकज भुजबळ यांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट फेटाळले
Just Now!
X