घटस्फोट घेण्यासाठी पतीने सलाईनमधून एचआयव्ही संक्रमित रक्त शरीरात चढवल्याचा आरोप पुण्यात थेरगाव येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेने केला आहे. तक्रारदार महिलेचा पती होमिओपथीचा डॉक्टर असून तिने यासंबंधी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हुंडयासाठी पतीकडून आपला छळ सुरु होता असा आरोपही तिने केला आहे.

या महिलेच्या वैद्यकीय अहवालानुसार तिला यावर्षीच्या जानेवारी महिन्यात एचआयव्हीची लागण झाली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात आजारी असताना नवऱ्याने एचआयव्ही संक्रमित सलाईन लावल्याचा आरोप महिलेने केला आहे. वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी ही माहिती दिली.

प्रकृती ढासळल्यानंतर या महिलेने रक्ताच्या काही चाचण्या केल्या असता एचआयव्हीची लागण झाल्याचे समजले. आपले पतीव्यतिरिक्त कुठल्याही परपुरुषासोबत शारीरिक संबंध नव्हते असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेला एचआयव्हीची लागण झाली आहे त्यासाठी पती जबाबदार आहे का ? त्यासंबंधी पोलिसांनी अजून तपास सुरु केलेला नाही. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

या महिलेच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत असे सतीश माने यांनी सांगितले. वापरलेली सुई किंवा संक्रमित रक्त शरीरात गेल्यामुळे एचआयव्हीची लागण होऊ शकते. सलाईनमधून दिलेले संक्रमित रक्त कोणाचे होते हे त्या महिलेला माहित असेल तर त्या महिलेची आणि एचआयव्ही बाधित व्यक्तीची डीएनए चाचणी करुन शोधून काढता येऊ शकते असे संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ भारत पुरंदरे यांनी सांगितले. २०१५ मध्ये लग्न झाल्यानंतर नवरा आणि सासू-सासऱ्यांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी आपल्यामागे तगादा लावला होता असा आरोप महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे.