महड विषबाधाप्रकरणी महिलेला अटक

अलिबाग : सततचा अपमान आणि शेरेबाजी यामुळे सूडभावनेने दग्ध झालेल्या एका महिलेनेच महड येथील अन्नविषबाधा प्रकरण घडविल्याचे उघड झाले आहे.  प्रज्ञा ऊर्फ ज्योती सुरेश सुरवसे असे या महिलेचे नाव असल्याचे रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतजाहीर केले.

खालापूर तालुक्यातील महड येथे वास्तुशांतीच्या कार्यक्रमानंतर ६१ गावकऱ्यांना विषबाधा झाली होती. यातील पाचजणांचा मृत्यू झाला, तर अन्य १७ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

या धक्कादायक प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस तपास सुरू करण्यात आला होता. वास्तुशांतीनंतर अन्न शिजवणाऱ्या आणि जेवण वाढणाऱ्या सर्वाची चौकशी पोलिसांनी सुरू केली होती. ती सुरू असतानाच घराच्या मागील बाजूस एका प्लास्टिकच्या पिशवीत दाणेदार आकारातील विषारी वस्तू आढळून आली.  हे किटकनाशक असल्याचा संशय पोलिसांना आला. या पिशवीनेच पोलिसांना विष कालवणाऱ्या महिलेचा छडा लागला. तपासात प्रज्ञा हिने आपल्या  या दुष्कृत्याची कबुली  पोलिसांना दिली.

प्रज्ञा उर्फ ज्योती हिचे सुरेश सुरवसे याच्याशी दुसरे लग्न झाले होते. मात्र कुटुंबातील  सर्वजण तिचा अपमान आणि मानसिक छळ करीत होते. स्वयंपाक येत नाही, म्हणून तिचा रोज पाणउतारा होत होता.  सावळ्या रंगावरून तिला हिणवले जात होते. वर्तन चांगले नाही म्हणूनच तिचे पहिले लग्न मोडले, अशी शेरेबाजीही होत असे. या अपमानामुळे ती सूड घेण्याच्या विचाराने धगधगत होती. या रागातूनच या सर्वाचा काटा काढण्याचा कट तिने रचला होता.

वास्तुशांतीच्या दिवशी तिने कीटकनाशक औषध विकत आणले, हे औषध तिला सर्वच अन्नात मिसळायचे होते. मात्र घरातील काहीजणांनी आधीच जेवून घेतल्याने तिचा नाइलाज झाला. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मात्र तिने वरणाच्या बादलीत हे विषारी औषध कालवले.

मग ती कीटकनाशकाची पिशवी तिने घरामागे नेऊन टाकली. त्या वरणातून ६१जणांना विषबाधा होऊन पाचजण नाहक प्राणास मुकले.

प्रज्ञा सुरवसे हिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे. तिच्या कटात आणखी कुणाची साथ होती का, याचाही तपास केला जात आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय पांढरपट्टे, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय काईंगडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जमिल शेख, महेंद्र शेलार, हर्षवर्धन बारवे आणि आंबिका अंधारे यांच्या पथकाने तपासात महत्वाची भूमिका बजावली.

कट आणि उकल

* सावळा वर्ण आणि स्वयंपाक येत नसल्यावरून होणाऱ्या शेरेबाजीने प्रज्ञा संतप्त.

* घरच्या लोकांचा काटा काढण्याचा विचार. त्यासाठी कीटकनाशक आणले.

* सकाळच्या जेवणात ते मिसळता आले नाही, पण संध्याकाळच्या वरणात मिसळले.

* पिशवी घरामागे टाकली. ती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या प्रकाराचा छडा लागला.