नाशिकमध्ये एका महिलेने कौटुंबिक वादाला कंटाळून पंचवटी पोलीस ठाण्यासमोर स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. कारण या घटनेत त्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हरप्रीत संधू असं त्यांचं नाव असून पंचवटी पोलीस ठाण्याबाहेरील रस्त्यावर त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील टकले नगर या भागात राहणाऱ्या अमनप्रीत संधूचं लग्न रायपूरच्या राजेंद्र पट्टा यांच्याशी झालं. ८ जानेवारीला हे लग्न लावून देण्यात आलं होतं. मात्र नवरा आपल्याला मारहाण करतो. छळ करतो ही बाब सहन न झाल्याने अमनप्रीत संधू या नाशिकच्या त्यांच्या घरी परतल्या. अमनप्रीतची आई हरप्रीत आणि वडिलांनी मुलीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि तिला सासरी जाण्यास सांगितले. तेव्हा अमनप्रीतने सासरी न जाता थेट मैत्रिणीचं घर गाठलं. मुलगी सासरी न जाता मैत्रिणीकडे जाऊन राहिली आहे हे समजल्यावर आई वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र मी माहेरीही येणार नाही आणि सासरीही जाणार नाही मी सज्ञान आहे. मला माझं हित समजतं अशी भूमिका अमनप्रीतने घेतली. त्यानंतर तिने आपल्याला होणारा त्रास काय आहे हे पोलिसांना कळवण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं. तिथे आपली मुलगी आपली तक्रार घेऊन गेली आहे असं तिच्या आई वडिलांना वाटलं. मात्र पोलिसांनी ही मुलगी सज्ञान आहे तिच्या मनाविरोधात आम्हाला तिला काहीही सांगता येणार नाही असं सांगितलं.

पोलिसांचं हे उत्तर ऐकून हरप्रीत बाहेर आल्या. त्यांना कुठून कसं पेट्रोल मिळालं ते समजलं नाही. मात्र पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर रस्त्यावर येऊन त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेत त्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्या आहेत. आता त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कौटुंबिक वादातून हरप्रीत यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.