करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढून स्वत:च्या घराचा परिसरही प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र घोषित झाल्यामुळे घाबरून गेलेल्या एका महिलेने आत्महत्या करून स्वत:चा जीव संपविला. बार्शी शहरात हा दुर्दैवी प्रकार घडला.

लक्ष्मी अनंत बगाडे (वय ४७, रा. लहूजी वस्ताद चौक, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात तिचे नातेवाईक सचिन लोंढे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात माहितीनुसार बार्शी शहरात अलीकडे करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला असून मृत लक्ष्मी बगाडे यांच्या घराच्या परिसरातही करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे तेथील परिसर प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवनावर बरीच बंधने आली आहेत. करोना विषाणू आपल्या घराजवळ पोहोचला आहे. तो आपल्या घरातही येईल, याची धास्ती लक्ष्मी बगाडे यांनी घेतली होती. त्यातून तिची मानसिक स्थिती ढासळली.

दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली असता लक्ष्मी बगाडे घाबरून घराबाहेर पडल्या. तिची समजूत घालून समुपदेशनही करण्याचा प्रयत्न झाला. परंतु घाबरलेल्या लक्ष्मीने अखेर बार्शीच्या सुभाष नगर भागातील तलावात उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह तेथेच सापडला.