गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात जामखेड येथे गुरुवारी जमावाने एका महिला पोलिसाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने महिला पोलीस नाईक शबनम दिलावर शेख या घटनेतून बचावल्या. अतिक्रमण हटाव मोहीम राबवताना विरोध करणाऱ्यांनी हा प्रयत्न केला. यासंदर्भात पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तिघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश शुक्रवारी दिला.
जामखेडमधील बाजारतळावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी ग्रामपंचायतीने गुरुवारी मोहीम राबवली. सहायक पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तही तैनात होता. तेथे मोहन पवार व त्याचा भाऊ लहू पवार याची बांबू व बारदान लावून उभारलेली चहाची टपरी होती. ती हटवण्याला पवार कुटुंब विरोध करीत होते.
अतिक्रमण काढले जात असतानाच लहू सीताराम पवार याने टपरीतून रॉकेलची बाटली आणली व ती तेथे उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर उपडी केली. पवार याच्या कुटुंबातील इतर लोकही त्याच वेळी काडी लावा, असे ओरडत होते. मोहन पवार याने काडी पेटवून ती शबनम शेख यांच्या अंगावर टाकली, मात्र त्या बचावल्या. शेख यांनीच दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन पवार, त्याची पत्नी, लहू पवार, त्याची पत्नी, भाचा सूरज पवार, बापू धांडे, विजय पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.