12 December 2019

News Flash

धावत्या रिक्षातून चालकाने ढकलल्याने महिलेचा मृत्यू

अंबिका जनार्दन घंटे (रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र

कारंबा नाक्याजवळील घटना

सोलापूर : दिलेली आठ हजारांची रक्कम परत मागितल्याने संतापलेल्या रिक्षाचालकाने एका ओळखीच्या महिलेला धावत्या रिक्षातून ढकलून दिल्याने ती गंभीर जखमी होऊन मरण पावली. शहरात कारंबा नाक्याजवळ नवीन डी-मार्टजवळ सायंकाळी घडली. या प्रकरणी संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

अंबिका जनार्दन घंटे (रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्य़ात रिक्षाचालक श्रीशैल बनसोडे याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. सायंकाळी बाळे येथे मृत अंबिका ही रिक्षाचालक बनसोडे यास भेटली. या दोघांची दीड वर्षांपासूनची ओळख होती. अंबिका ही बनसोडेच्या घरी चपात्या लाटून उदरनिर्वाह चालवत असे. कष्टाने पै-पै करीत तिने काही रक्कम जमा केली होती. दरम्यान, ओळखीच्या श्रीशैल बनसोडे याने अंबिका हिला स्वत:ची आर्थिक अडचण असल्याने पैशाची गरज असल्याचे सांगितले. अंबिका हिने त्याच्यावर विश्वास ठेवून परत देण्याच्या अटीवर त्याला आठ हजारांची रक्कम हातउसने दिली होती. घेतलेली रक्कम परत मागितली असता बनसोडे हा रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत होता. उलट, तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन बदनामी करण्याची धमकी देत होता. याच कारणावरून मृत अंबिका ही आपली नातलग भामाबाई टेळे हिच्यासह रिक्षाचालक श्रीशैल बनसोडे यास भेटण्यासाठी बाळे येथे रिक्षा थांब्यावर गेली होती. तेथे त्यांची भेट झाल्यानंतर रक्कम परत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले. तेव्हा रागाच्या भरात बनसोडे हा अंबिका व भामाबाई या दोघींना रिक्षात बसवून मड्डी वस्तीकडे जाण्यासाठी निघाला. धावत्या रिक्षातही भांडण सुरूच होते. त्यातूनच वाटेत कारंबा नाक्याजवळ नवीन डी-मार्टसमोर बनसोडे याने धावत्या रिक्षातून अंबिका हिला ढकलून दिले. यात डोक्याला आणि हाता-पायांना मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

First Published on June 20, 2019 3:34 am

Web Title: woman death after driver push her from running rickshaw
Just Now!
X