विरार : वसई येथील एका वृद्ध महिलेला वेळेवर ऑक्सिजन आणि रुग्णालयात खाट उपलब्ध न झाल्याने रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिचा मुलगा शहरभर विचारपूस करत राहिला. डॉक्टरांना विनवण्या करत राहिला, पण प्रशासनाच्या आणि खासगी रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे आपल्या आईला वाचवू शकला नाही.

वसई पश्चिम येथील आनंद नगर परिसरात राहणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्ध महिलेस शनिवारी रात्री रक्तदाब व श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना शेजारील खासगी दवाखान्यात घेऊन गेले होते.

तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून रुग्णालयात भरती करून घेतले. तेथे तिचा करोना अहवाल सकारात्मक आल्याने पुढील उपचारासाठी नालासोपारा येथील एव्हर शाइन सिटी येथील आयसीएस रुग्णालयामध्ये दाखल केले.

बुधवारी त्यांची स्थिती बिघडल्याने डॉक्टरांनीच त्यांना सुविधा नसल्याचे सांगत कोविड रुग्णालयात जाण्याचे सांगितले. महिलेच्या मुलाने वसई-विरारमधील बहुतांश रुग्णालयात फोन करून विचारणा केली असता त्यांना खाटा उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले.

पुढे तिला मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्याचे ठरले मात्र तेथे खाटा उपलब्ध आहेत किंवा कसे या संदर्भात संपर्क होऊ शकला नसल्याने अखेर शहरातीलच कौल सिटी येथील करोना उपचार केंद्रात हलवण्याचे ठरले.

तेथे नेत असताना रुग्णवाहिकेतील सिलिंडरमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण कमी असल्याने महिलेची स्थिती अधिकच बिघडत गेली. जेव्हा ते पालिकेच्या करोना उपचार केंद्रात पोहचले तेथे जीवन रक्षा प्रणालीची (वेन्टीलेटर) सुविधा नसल्याने उपचार होणार नाहीत असे सांगण्यात आले.

पण महिलेची स्थिती हाताबाहेर जात असल्याने तो ऑक्सिजनसाठी आणि उपचारासाठी डॉक्टरांच्या विनवण्या करत राहिला. दरम्यान त्याच्या आईने वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेतला.  या प्रकारामुळे आरोग्य विभागाची अनास्था उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

महापालिका आणि खासगी रुग्णालयाच्या बेफिकिरीने माझ्या आईचा जीव गेला आहे. खासगी रुग्णालयातून आम्हाला हाकलून लावले तर पालिकेत सुविधा नसल्याने उपचार झाले नाहीत. माझ्या आईच्या बाबतीत जे झाले ते इतरांना भोगावे लागू नये, प्रशासनाने खरंच सुविधा वाढविणे गरजेचे आहे  

– महिलेचा मुलगा

महिला दाखल असलेल्या रुग्णालयाने आम्हाला माहिती दिली की, रुग्ण ऑक्सिजनवर नसून त्याची स्थिती व्यवस्थित आहे, यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली. पण रुग्णाला केंद्रात आणले असता रुग्णवाहिकेतच त्यांची स्तिथी नाजूक होती. त्यांना तातडीची ऑक्सिजनची गरज होती. पण केंद्रातील सर्व ऑक्सिजन खाटा भरल्या असल्याने आम्ही ऑक्सिजन उपलब्धत करेपर्यंत रुग्ण दगावला

– डॉ. तबस्सुम काझी, वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका