26 May 2020

News Flash

भररस्त्यात महिलेची प्रसूती; रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

वरूड आणि मोर्शी येथील शासकीय रुग्णालयाची ढिसाळ यंत्रणेमुळे या गर्भवती महिलेचा बळी गेला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

अमरावती : रुग्णांसाठी चोवीस तास रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून दिल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असताना एका महिलेचा रुग्णवाहिकेअभावी वेळेत उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मोर्शी येथे उघडकीस आली आहे. दुर्दैवाचे फेरे येथेच थांबले नाहीत, तर महिलेची भरचौकात उघडय़ावर प्रसूती झाली. तिला नंतर मालवाहू रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आले.

वरूड आणि मोर्शी येथील शासकीय रुग्णालयाची ढिसाळ यंत्रणेमुळे या गर्भवती महिलेचा बळी गेला आहे. आशा परशुराम बारस्कर (३५, रा. जरूड) असे मृत महिलेचे नाव आहे. आशा बारस्कर हिला प्रसूतीकळा सुरू झाल्याने तिला वरूड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून तिला तात्काळ अमरावती येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेरीस आशा आणि तिचा पती हे दोघे एस.टी. बसने मोर्शीला गेले. प्रसूती वेदना वाढल्याने एस.टी. वाहकाने महिलेला मोर्शी येथील जयस्तंभ चौकात उतरवून दिले. त्यावेळी तिला प्रचंड त्रास होत होता. त्याचवेळी चौकात हजर असलेले मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य कमर अली लियाकत अली यांनी तात्काळ धावाधाव करून रुग्णालयातील दायी कमलाबाई यांना जयस्तंभ चौकात आणले. आडोसा तयार करून भरचौकातच या महिलेची प्रसूती करण्यात आली. तिचा त्रास एवढय़ावरच थांबला नाही, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. शेवटी एका मालवाहू रिक्षात टाकून तिला मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला अमरावतीला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.

राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या मतदारसंघात ही दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्याच्या मुख्यालयी देखील चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना अमरावतीला पाठवण्याचा सल्ला दिला जातो. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होते. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास रुग्णांचे प्रचंड हाल होतात. पण, रुग्णालयातील यंत्रणा केवळ सल्ला देऊन मोकळी होते. यंत्रणांच्या याच बेपर्वा वृत्तीमुळे यापूर्वीही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एका गर्भवती महिलेची भरचौकात प्रसूती होणे आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू होणे ही बाब व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे निदर्शक ठरली आहे.

महिलेच्या मृत्यूनंतर तिचे नातेवाईक संतप्त झाले. ढिसाळ यंत्रणा आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आशा हिचा बळी गेल्याचा आरोप त्यांनी केला. महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मरण पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:01 am

Web Title: woman dies during labor pain on road in amravati zws 70
Next Stories
1 नशिक राज्यमार्गावर लक्झरी व रिक्षा मध्ये अपघातात एक भाविक ठार 
2 “हे फडणवीस असो की नाना फडणवीस, काय बोलणार हे सांगायची गरज नाही”
3 भाजपा सरकारने सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केली : धनंजय मुंडे
Just Now!
X