वैतरणा खाडीपुलावरून महिला नदीत कोसळली; शोधकार्य सुरू

वैतरणा खाडीपुलावरील रेल्वे रुळाच्या बाजूच्या लोखंडी पट्टय़ांवरून अनेक वर्षांपासून पायी प्रवास करीत असलेले वाढीव बेटवासीयांना आणखी एका दु:खद घटनेला गुरुवारी सामोरे जावे लागले. पुलावरील तुटलेल्या पादचारी लोखंडी पट्टय़ावरून तोल जाऊन महिला नदीत पडल्याची घटना घडली. बेबीबाई रमेश भोईर (६०) असे या महिलेचे नाव आहे. २४ तासांपासून त्या बेपत्ता आहेत. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप वाढीव ग्रामस्थांनी केला आहे.

बेबी या गुरुवारी पालघरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. तेथे खाजगी रुग्णालयात त्यांची मुलगी उपचारार्थ दाखल असल्याने त्या आपल्या मुलीसाठी डबा घेऊन वैतरणा पुलावरून वैतरणा स्थानक गाठण्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास जात होत्या. मुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे घाईत चालत असताना त्यांचा तोल गेला.

रेल्वे रुळांलगत लोखंडी पट्टय़ांनी तयार करण्यात आलेल्या पादचारी पायवाटेत फटीमधून त्या पुलाखालून वाहणाऱ्या वैतरणा नदीत पडल्या. त्यांच्या पुढे चालत असलेल्या पादचारी व्यक्तीच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी बेबी यांच्या घरी ही घटना कळवली. पोलिसांना कळविल्यानंतर बेबी यांचा शोध सुरू झाला.

सफाळे स्थानक आणि वैतरणा स्थानकांच्या मध्यभागी पूर्वेला वसलेले वाढीव हे बेट असून सुमारे दोन हजार लोकसंख्येचे हे गाव अनेक समस्यांनी त्रस्त आहे.

गावातील विद्यार्थी, महिला आणि कामगारांना सफाळे वा वैतरणा स्थानक गाठण्यासाठी वैतरणा पुलावरील रेल्वे रुळाच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने लोखंडी पट्टय़ा टाकून बनविलेला पादचारी मार्गाने जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पहाटे या पुलावरील धोकादायक मार्गातून भर अंधारात नेहमीचा प्रवास करावा लागत असल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे.

पट्टी तुटली

पादचारी पट्टय़ांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले, त्यामुळे गेल्या आठवडय़ात ये-जा करणाऱ्या पादचारी मार्गातील दुरवस्था झालेली लोखंडी पट्टी तुटली होती. त्यावरून चालणे नागरिकांना जिकरीचे झाले असून याबाबत रेल्वेकडे तक्रार करण्यात आली आहे.

स्वतंत्र मार्गिकेची गरज

वैतरणा व वाढीव बेटावर राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील नागरिकांच्या दळणवळणासाठी सुरक्षित मार्ग तयार करून देणे गरजेचे आहे. मात्र अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा सुरक्षित मार्ग तयार करण्यात आला नाही यामुळे कोणतेही काम असेल तर या धोकादायक पुला शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. पंरतु हा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे वैतरणा-डहाणू प्रवासी सेवा भावी संस्थेच्या वतीने सतीश गावड यांनी या भागात जेट्टी तयार करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातून डहाणूच्या दिशेने प्रवास करताना सुरवातीलाच वैतरणा स्थानक आणि गाव परिसर आहे.

मोठी नागरी वस्ती आहे. वैतरणा गाव हे एक बेट आहे. परंतु या बेटावर ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही यामुळे या नागरिकांना रेल्वे पूल क्रमांक ९३ या खाडीपुलावरून प्रवास करावा लागत आहे. नुकताच एका ६० वर्षीय महिलेचा रेल्वे पुलावरून प्रवास करताना सोसाटय़ाचा वारा आल्याने तोल जाऊन लोखंडी पट्टीच्या फटीतून पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याआधी सुद्धा याभागात मोठय़ा प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना झालेले अपघात, तसेच धावत्या उपनगरी गाडय़ांमधून भिरकावून दिलेले नारळ लागल्याने अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

अडचणी कायम

या भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी रेल्वेचा लोखंडी पुल हा एकमेव मार्ग आहे. या पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या धोकादायक असलेल्या पुलावरूनच शाळकरी मुळे व नागरिक प्रवास करीत असतात.

या पुलावरून प्रवास करताना येथील नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामधंद्यासाठी या व इतर लागणाऱ्या जिवनावश्यक वस्तूसाठी नागरिकांना वैतरणा रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. गॅस सिलिंडर, तांदळच्या गोणी आणि जड वस्तू डोक्यावर घेऊन या पुलावरून चालत जावे लागत आहे. सध्या शहराची वाढती लोकसंख्या यामुळे रेल्वे पुलावरून ये जा करणाऱ्या रेल्वे गाडय़ांची संख्या वाढली आहे.

पुलावरून जात असताना दोन ते तीन वेळा उपनगरी गाडय़ा, लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरूच असतात अशा वेळी या नागरिकांना पुलाच्या बाजूला बनविण्यात आलेल्या सुरक्षा चौकी मध्ये जाऊन थांबावे लागत आहे. या चौक्याही दूर ठिकाणी असल्याने प्रवाशांना धावपळ करून या चौकी पर्यंत पोहचावे लागते.