22 October 2020

News Flash

# MeToo: गँगरेप पीडितेचा अपमान केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांविरोधात तक्रार

दीपक केसरकर यांनी हे सगळे आरोप फेटाळले असून बलात्कार पीडित मुलीची आई जे सांगते आहे त्यात तथ्य नाही असे म्हटले आहे

दीपक केसरकर (संग्रहित छायाचित्र)

#MeToo या मोहिमे अंतर्गत अनेक दिग्गजांवर आरोप होताना दिसत आहेत. अशात एका सामूहिक बलात्कार पीडितेच्या आईने महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अपमान केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर माझ्याविरोधात आणि माझ्या बलात्कार पीडित मुलीविरोधात अपशब्द वापरून आमचा अपमान केल्याचेही या महिलेने म्हटले आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. दरम्यान गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मी अशा प्रकारे कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. बलात्कार पीडित मायलेकींशी बोलताना मी कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत असे म्हणत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

महिलेने नेमके काय म्हटले आहे?
२०१७ मध्ये माझ्या अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिला मादक पदार्थ खायला घालून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी फक्त एका नराधमाविरोधात तक्रार दाखल केली इतर सहा जणांना मोकाट सोडले. ज्यानंतर मी दाद मागण्यासाठी मी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना भेटले. मी त्यांच्या कार्यालयात गेले होते त्यावेळी ते माझ्या अंगावर खेकसले. तुमची लायकी काय आहे? जास्त बडबड करू नका असे म्हणत मला आणि माझ्या मुलीला हाकलून दिले असे या महिलेने म्हटले आहे.

मात्र हे सगळे आरोप दीपक केसरकर यांनी फेटाळून लावले आहेत. पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून मी माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न केले. जेव्हा ही महिला आणि तिची मुलगी मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात आले होते त्यावेळी माझ्या कार्यालयात २० ते २५ लोक होते. जे काही घडले ते सगळ्यांनी पाहिले ही महिला जो दावा करतेय त्यात तथ्य नाही. अल्पवयीन मुलीसोबत जे घडले ते क्लेशदायकच आहे. मी त्यांना माझ्या परिने दिलासा देण्याचा प्रयत्न केला खेकसलो नाही आणि अपमान तर मुळीच केला नाही असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:11 pm

Web Title: woman filed a complaint against maharashtra minister over for insulting behavior
Next Stories
1 गांधीजी काँग्रेसच्या नव्हे तर भाजपा विचारांचेच – गिरीश महाजन
2 #MeToo: शैक्षणिक संस्थांमधूनही अनेक तक्रारी समोर – विनोद तावडे
3 संभाजी महाराज दारुच्या कैफात, ‘सर्व शिक्षा अभियाना’च्या पुस्तकात वादग्रस्त उल्लेख
Just Now!
X