कुटुंबातील चारजण अलगीकरण कक्षात

डहाणू : पाच दिवसांपूर्वी मुंबई येथून डहाणूतील केटीनगर येथील नातेवाईकांकडे आलेल्या ४२ वर्षीय महिलेला करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबातील चार जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे. महिला व तिचा मुलगा २० मे रोजी सांताक्रूझ येथून डहाणूतील के टीनगरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आली होती.  प्रवासात तिला त्रास झाल्यामुळे डहाणूतील फिनिक्स रुग्णालयामध्ये नेण्यात आले. रुग्णालयाने तिला  डहाणू उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे  तपासणी करण्यात आली.  त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे महिलेचा मुलगा व ज्यांच्याकडे ते आले होते, त्या कु टुंबातील तीन जण अशा चार जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.  या पार्श्वभूमीवर डहाणू नगरपरिषदेने सर्व केटी नगर परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. फिनिक्स रुग्णालयदेखील बंद करण्यात आले असून निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरू आहे. परिसरातील सर्व सोसायटय़ांनी स्वयंनिर्णयाने स्वत:चे क्षेत्र प्रतिबंधित के ले आहे.

पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण

वाणगाव कोमपाडा येथे राहणाऱ्या आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काही दिवसापूर्वी एका परिचारिकेला करोनाची लागण झाली होती. त्यावेळी वाणगाव कोमपाडा प्रतिबंधित करण्यात आला होता. त्यानंतर आता दुसरा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत आणि पोलीस विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे.