अडचणीच्यावेळी दिल्लीतच तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. आम्ही विधवा नाही एक महिला आहोत. नवरा कमकुवत होता तो गेला मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही. माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे असे म्हणत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले.

रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. इंग्रजी साहित्यातील सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलवण्यात आले होते. मात्र त्यांना दिलेले निमंत्रण मनसेच्या भूमिकेमुळे मागे घेण्यात आले. मनसेने मात्र या प्रकरणी माघार घेत सहगल यांना आमचा विरोध नाही असे सांगितले तरीही नयनतारा सहगल या संमेलनाला आल्या नाहीत. ज्यानंतर शेतकऱ्या विधवेच्या हस्ते या साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय झाला. ज्यानंतर वैशाली येडे यांनी भाषण करत माझ्या वैधव्याला यंत्रणा जबाबदार असल्याचं म्हटलं.

साहित्य संमेलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही येथील ग्रंथदालनाची पाहणी केली. नयनतारा सहगल प्रकरणाचा निषेध करण्यासाठी संमेलनाच्या बाहेर असीम सरोदे यांनी उपोषणही केले. आता संमेलनाध्यक्ष अरूणा ढेरे काय बोलतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.