श्री क्षेत्र पाली येथील मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या यात्रेत शनिवारी मानाचा हत्ती उधळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत एक भाविक महिला ठार, तर १५ भाविक जखमी झाले.
पाल येथील खंडोबाच्या यात्रेत आज मुख्य रथोत्सवाचा दिवस होता. यासाठी देवांना घेऊन निघालेल्या या मानाच्या हत्तीचा पाय विस्तवावर पडल्याने तो उधळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्ती उधळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत अंजनाबाई नामदेव कांबळे (वय ६५, रा. कोल्हापूर) या मृत्यू पावल्या. तर, १५ भाविक गंभीर व किरकोळ जखमी झाले. यंदाच्या यात्रेला भाविकांची विक्रमी उपस्थिती होती. यात्रेतील महत्वाची परंपरा असलेल्या खंडोबा व म्हाळसा यांच्या विवाहास सुरुवात झाली. यासाठी हत्तीवरून देवाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी या हत्तीच्या भोवतीने त्यावर भंडारा टाकण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यामध्ये दुपारी मिरवणूक मार्गावर एकेठिकाणी या हत्तीचा पाय विस्तवावर पडल्याने तो उधळला.