कराडजवळील घटनेत १५ जण जखमी

कराड : एसटी बसवर मोटारकार धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार,तर सुमारे १५ जण जखमी झाल्याची घटना कराड-चिपळूण रस्त्यावर येणपे (ता. कराड) येथे आज सोमवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. विजया विनायक नाईक (४२, रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, कामना सोसासायटी, दादर मुंबई.) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. तर, जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईहून रत्नागिरीहून निघालेली स्विफ्ट (क्र. एमएच ४७, एन ७८३०) ही मोटारकार कराड एसटी आगाराची शेडगेवाडीहून कराडच्या दिशेने निघालेल्या बसला (एमएच १४, बीटी ४८५९) जोरात धडकल्याने हा अपघात झाला. येणपे एसटी बस थांब्याच्या पाठीमागे शाळकरी मुले घेण्यासाठी बस थांबवून ती पुढे निघताच भरधाव स्विफ्ट कारने बसला धडक दिली. कारचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोटारकारमधील  अजय दत्तात्रय कीर (४३), अंजली दत्तात्रय कीर (४२), सुवर्णा दत्तात्रय कीर (७०), विजया विनायक नाईक (४२, सर्व चारही रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, कामना सोसासायटी, दादर मुंबई) व कारचालक अब्दुल अजीज मकरानी (२९, रा. पश्चिम अंधेरी, मुंबई) हे गंभीर जखमी झाले. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, विजया नाईक यांचे निधन झाले.  कराड-शेडगेवाडी एसटी बसमधील श्रेया शिरसट, मेघा शिरसट, नम्रता शिरसट, अजय जाधव यांच्यासह एकूण आठ-दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद उंडाळे पोलीस दूरक्षेत्रात झाली असून, पोलीस सहनिरीक्षक दीपज्योती पाटील या अधिक तपास करीत आहेत.