औरंगाबाद : प्रियकराकडून पतीचा काटा काढणाऱ्या पत्नीच्या कृत्याचे रविवारी बिंग फुटले. गुंगारा देणारा तिचा प्रियकर ज्ञानदेव नामदेव तुपे हा अखेर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला. त्यानेच सर्व माहिती पोलिसांना सांगितली. कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे २२ मे रोजी घडलेल्या खुनाच्या घटनेचा तब्बल सव्वा महिन्यांनी उलगडा झाला असून आता पोलीस मृताच्या पत्नीला अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत.

कन्नड तालुक्यातील घुसूर तांडा येथील शिवलाल बाळू राठोड याचा २२ मे रोजी शिवारात मृतदेह आढळला होता. डोक्यात दगडाचा मार व अन्य ठिकाणीही वार केल्यामुळे हा सारा प्रकार खुनाचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी गोवर्धन नारायण राठोड यांच्या तक्रारीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अज्ञात असल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. खुनाची घटना घडल्यापासून नेवासा तालुक्यातील बुऱ्हाणपूर येथील ज्ञानदेव नामदेव तुपे हा गायब होता. त्याच्यावर पोलीस लक्ष ठेवून होते. रविवारी तो घोडेगाव येथे आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक एस. बी. कापुरे आदींनी शिताफीने तुपे यास गावातून ताब्यात घेतले. घटनेबाबत त्याने पोलिसांना सांगितले की, मृत शिवलाल राठोड याची पत्नी रंजनाबाई व त्याचे आंबा तांडा येथे ट्रॅक्टरवर काम करीत असताना सूत जुळले. दोघांमधील संबंधास रंजनाबाईचा पती शिवलाल याचा अडथळा होत होता. शिवलाल हा तिला दारू पिऊन मारहाण करीत असे. त्यामुळे ती त्याला वैतागली होती. तिने शिवलाल याला संपवण्याचा कट रचला.