शेतजमीन नांगरण्यास विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलेला ट्रॅक्टरची धडक देऊन तिचा खून करण्यात आला. या वेळी झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. सोमवारी सकाळी ओझर बुद्रुक येथे ही घटना घडली.
ओझर येथील सखाराम भिवा नागरे व हरिभाऊ रामभाऊ कांगणे यांच्यात गट नं. १११ मधील जमिनीवरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आज सकाळी हरिभाऊ कांगणे, संदीप कांगणे, राजेंद्र कांगणे, जािलदर सांगळे, रामनाथ नागरे, मीना कांगणे, अरुणा नागरे, हौसाबाई कांगणे, यमुनाबाई सांगळे, मथुरा घुगे, अशा कांगणे, रमेश कुटे हे येथे जमीन नांगरण्यासाठी गेले असता जमिनीत चारा काढण्यासाठी सखाराम नागरे, मारुती नागरे, पार्वताबाई नागरे, अनिता नागरे, रंजना नागरे, कौसाबाई सानप, बाळासाहेब नागरे हे गेले होते. त्यांनी आपले उभे बाजरीचे पीक कांगणे कुटुंबीय नांगरत असल्याचे बघून त्याला विरोध केला असता हरिभाऊ कांगणे यांनी आपल्या हातातील कुऱ्हाडीने अनिता नागरे हिच्या डोक्यावर वार केला तर संदीप कांगणे याने पार्वताबाई नागरे यांना ट्रॅक्टरने जोरात धडक दिली. या धडकेत नागरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिता नागरे, रंजना नागरे व कौसाबाई सानप या तिघी जखमी झाल्या. घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सायंकाळी उशिरापर्यंत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.