News Flash

जादूटोण्याच्या कचाटय़ात महिलांचे प्रमाण अधिक

जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत तक्रारींचे अर्धशतक गाठले गेले असले तरी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिलांचे शारीरिक व आर्थिक शोषण करण्याचे अनेक गुन्हे समाविष्ट

| February 26, 2014 03:25 am

जादूटोण्याच्या कचाटय़ात महिलांचे प्रमाण अधिक

जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत तक्रारींचे अर्धशतक गाठले गेले असले तरी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिलांचे शारीरिक व आर्थिक शोषण करण्याचे अनेक गुन्हे समाविष्ट असल्याचे लक्षात येते. अंधश्रद्धेच्या कचाटय़ात प्रामुख्याने महिला सापडत असल्याने त्यांच्यासाठी हा कायदा आशेचा किरण ठरत आहे. विशेष म्हणजे, दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक झाली नसताना राज्यभरात स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल होत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्य शासनाने जादूटोणाविरोधी कायद्याचा अध्यादेश जारी केला. २६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यास सहा महिने पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात हिवाळी अधिवेशनात या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्यान्वये पोलिसात आलेल्या तक्रारींची संख्या पन्नासवर पोहोचली आहे. काही गुन्ह्यात माघार घेण्यात आल्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास आपण नेमक्या कोणत्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो असा प्रश्न पडतो. अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये महिला भरडल्या गेल्याचे दिसते. वसईमध्ये मांत्रिकाच्या सांगण्यावरून कलावती गुप्ता यांचा बळी गेला. तर यवतमाळ जिल्ह्यातील गौरी गिरीचा मृत्यू नरबळी आहे काय, याची पोलीस छाननी करत आहे. सांगलीतील मिलिंद कांबळे या मांत्रिकाने कर्नाटकमधील मुलीच्या पत्रिकेतील दोष काढण्याच्या निमित्ताने बलात्कार करत बळी घेतला. तीन ठिकाणी नरबळीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
महिलांचे शारीरिक व आर्थिक शोषण केल्याप्रकरणी उस्मानाबादमधील मांत्रिक महेबुब याकत कुरणे, सोलापूरचा पुजारी नरसिंग तंतकार, मालेगावचा मांत्रिक अश्पाक खान, नागपूरमधील बंगाली बाबा, कवठे महाकाळचा मिलिंद कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिकच्या इंदिरानगरमधील ज्योतिषाकडून होणारे शोषण मात्र रोखले गेले, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांनी दिली. भूत करणी काढण्यासाठी मारहाण करणे व अघोरी उपचार केल्यामुळे अनेक गुन्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याचा आधार घेण्यात आला. यवतमाळ येथे महिलेच्या तोंडात विष्ठा कोंबण्याचा प्रकार उघड झाला.
दाखल झालेल्या गुन्ह्यांचे स्वरूप
नरबळी घेणे, नरबळीचा प्रयत्न करणे, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अमानुष मारहाण करणे, मानवी विष्ठा तोंडात घालणे, जादूटोणा-करणीच्या नावाखाली अमानवी अघोरी उपचार करणे, अलौकिक शक्तीचा दावा करून महिलांचे शोषण करणे, गुप्तधनासाठी अघोरी उपचार करणे, अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचा दावा करणे, वैयक्तिक उपचारापासून रोखत रुग्ण-भाविकांना अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणे, शरीराला जिवघेण्या जखमा होतील अशा प्रथांचा अवलंब करणे आदी प्रकारांचा दाखल झालेल्या गुन्ह्यात समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2014 3:25 am

Web Title: woman ratio high in black magic trape
टॅग : Woman
Next Stories
1 तीन अधिकाऱ्यांना चाबकाने मारहाण
2 वर्धा मतदारसंघ बदलण्याचे प्रयत्न फोल
3 राष्ट्रवादीचे सांगलीतील आमदार संजयकाका पाटील ‘भाजप’मध्ये!