शहरातून होणा-या अवजड वाहतुकीने आज, सोमवारी पुन्हा एका महिलेचा बळी घेतला. हा अपघात औरंगाबाद रस्त्यावर, हॉटेल नटराज लगत गुरुद्वारासमोर दुपारी झाला. अपघातास रस्त्यालगत असणारे विक्रेतेही कारणीभूत असल्याची चर्चा जमा झालेल्या जमावातून होत होती. अपघातानंतर वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.
शुभांगी संतोष पोतदार (वय ४०, रा. वसंतविहार, वसंत टेकडी, नगर) या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी गौरी (वय १६) जखमी झाली. दुपारी अडीचच्या सुमारास अपघात झाला. शुभांगी यांचे पती संतोष पोतदार सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत. ते नेवासे येथे नियुक्त आहेत. दोघी मायलेकी स्कूटीवरून (एमएच १६ एएक्स ४७७२) औरंगाबाद रस्त्याने घरी परतत होत्या. गुरुद्वारासमोरील रस्त्यावर गतिरोधक आहे, तेथे दोघींनी स्कूटीचा वेग काहीसा कमी केला, तेवढय़ात मागून येणा-या मालमोटारीने (एमएच ४० वाय २६७३) स्कूटीला धडक दिली. त्यात शुभांगी यांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद रस्त्यावर जीपीओ चौक ते सरकारी विश्रामगृहापर्यंतच्या भागात अनेक फळविक्रेते व अन्य रस्त्यावर बसलेले आहेत, त्यांच्यापुढे ग्राहकांच्या गाडय़ा लागतात, त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळे होतात, गुरुद्वारासमोर तर याच प्रकारामुळे रस्ता अरुंद झाला आहे. आजच्या अपघाताला हेही कारण झाले असल्याची चर्चा होत आहे. जमाव आंदोलनाच्या तयारीत होता, मात्र पोलिस वेळीच अपघातस्थळी पोहोचल्याने परिस्थितीवर नियंत्रण आले.