खोटा गुन्हा दाखल करणारे पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या बुरुडगावच्या (ता. नगर) आंदोलकांची व कोतवाली पोलिसांची आज, गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झटापट झाली. एका महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देऊन नंतर आंदोलक निघून गेले.
काल बुरुडगावमध्ये दोन गटांत तलवारीने मारामारी झाली. आमच्यावर हल्ला झाला, आम्ही जखमी झालो, मात्र पोलिसांनी आमच्यावरच दरोडय़ाचा खोटा गुन्हा दाखल केला, त्यामुळे पोलीस उपाधीक्षक पाटील यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व शनिवारी गाव बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन देण्यासाठी बुरुडगावच्या सरपंच अलेसिवा संजय पाचारणे, संजय पांडुरंग पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुष घोषणा देत व आरपीआय पक्षाचे झेंडे फडकावत जिल्हाधिकाऱ्यांकडे आले होते. मात्र त्यांनी कार्यालयाच्या गेटसमोरच ठिय्या दिला.
आंदोलकांपेक्षा पोलीस बंदोबस्त अधिक होता. एका महिलेने रॉकेलचा डबा अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला, तो पोलिसांनी हाणून पाडला, मात्र या महिलेचे नाव पोलिसांना अखेपर्यंत समजलेच नाही. गेटसमोरहून आंदोलकांना हटवताना, पोलिसांची व आंदोलकांची झटापट झाली. एका कार्यकर्त्यांचा शर्टही फाटला गेला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी आंदोलकांची समजूत घातली.