राहुल गांधींचे निवडणुकीत महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याचे सूतोवाच

प्रशांत देशमुख, वर्धा

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी निवडणुकीत महिलांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याचे सूतोवाच केल्यांनतर प्रामुख्याने राजकीय परंपरा असलेल्या घराण्याच्या लेकी-सुनांनीच निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे.

पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्षाध्यक्ष खासदार गांधी यांनी महिला व युवकांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देण्याचा संकल्प सोडला होता. राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत तसे चित्र उमटले. केवळ महाराष्ट्रातूनच चार युवकांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिवपद लाभले. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महिला काँग्रेस पुढे सरसावली आहे. वर्धा, शिर्डी (राखीव), उत्तर-मध्य मुंबई व नांदेड या चार लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळण्याची अपेक्षा महिला काँग्रेसला आहे.

प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा), उत्कर्षां रूपवते (शिर्डी), अमिता चव्हाण (नांदेड) व प्रिया दत्ता (मुंबई) यांचे अर्ज काँग्रेस समितीकडे पोहोचले आहेत. वध्रेतून उमेदवारीसाठी दावा करणाऱ्या टोकस या माजी राज्यपाल प्रभाताई राव यांच्या कन्या असून ३० वर्षांपूर्वी त्यांनी वर्धा जि.प.चे अध्यक्षपद भूषवले होते. अ.भा. महिला काँग्रेसचे सचिवपद भूषवताना त्यांनी छत्तीसगड व कर्नाटकच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. संघटनात्मक अनुभव ठेवणाऱ्या चारुलता यांना ‘स्वाभिमानी’चा दावा अडसर ठरू लागत आहे. शिर्डी राखीव मतदारसंघातून पक्षाकडे अर्ज करणाऱ्या उत्कर्षां रूपवते या माजी मंत्री दादासाहेब रूपवते यांच्या नात असून प्रदेश महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आहे. त्यांच्या राजकीय वारस्याच्या आणखी एक धागा म्हणजे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी सभापती मधुकरराव चौधरी यांच्या मुलीच्या त्या कन्या होत. आई-वडिलांकडून असा भक्कम वारसा लाभलेल्या उत्कर्षां रूपवते यांना पक्षातूनच एकनाथ कांबळे व राजू वाघमारे यांच्या दावेदारीचा सामना करावा लागत आहे. चव्हाण घराण्याच्या सूनबाई असणाऱ्या अमिता चव्हाण यांची उमेदवारीची इच्छा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पत्नी म्हणून पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या कन्या असलेल्या प्रिया दत्त यांनी उमेदवारीबाबत आढेवेढे घेतले होते, पण पक्षाध्यक्ष व अन्य नेत्यांनी त्यांना लढण्याचा आग्रह केल्यावर त्या तयार झाल्याचे सांगण्यात आले.

अशा या चार लेकी-सुनांच्या उमेदवारीकडे पक्षवर्तुळाचे लक्ष लागले आहे. चौघींनीही पक्षसंघटनेत सक्रिय राहून घराण्याचा वारसा चालवला. यापैकी श्रीमती टोकस व रूपवते या दोघी निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच संधी घेण्यास इच्छुक आहेत. संघटनेत केलेल्या कामाच्या आधारावर लढण्याची तयारी असल्याचा त्यांचा दावा घराणेशाहीचा आरोप खोडून काढताना त्या करतात.

श्रीमती चारुलता टोकस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीच महिलांना अधिक संधी देण्याचे ठरवले आहे. संघटना पातळीवर काम करण्याचा आमचा मोठा अनुभव आहे, पण लोकसभा निवडणुकीत संधी देताना विविध बाजू तपासल्या जातात. त्यामुळे कितपत प्रतिनिधित्व मिळेल, हे सांगता येणार नाही. प्रत्येक राज्यात महिलांना दोन जागा पक्षातर्फे  मिळण्याची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र वेगळे राहील.