खोपोली नगर परिषदेच्या विशेष समित्यांच्या सभापतिपदांसाठी सोमवारी निवडणूक झाली. सहापकी पाच समित्यांवर महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या राजकारणात महिलाराज पाहावयास मिळणार आहे. या निवडणुकीसाठी प्रांत दत्तात्रेय भडकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
परिवहन समितीवरील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने व महिला बालकल्याणच्या उपसभापतिपदासाठी एकही अर्ज न आल्याने ती निवड पुढे ढकलण्यात आली.
खोपोली नगर परिषदेच्या विशेष समित्यांची प्रतिवार्षिक निवडणूक सोमवारी संपन्न झाली. या निवडणुकीसाठी प्रांत दत्तात्रेय भडकवाड यांनी काम पाहिले. बांधकाम समितीसाठी राष्ट्रवादीच्या समीना जलगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. आरोग्यासाठी राष्ट्रवादीच्या माधवी रीठे यांनी अर्ज भरला होता. नियोजन समितीसाठी राष्ट्रवादीच्या मेघा वाडकर यांनी अर्ज भरला होता.
शिक्षण समितीसाठी राष्ट्रवादीच्या रुपाली जाधव यांनी अर्ज भरला होता. तसेच महिला व बालकल्याण समितीसाठी शिवसेनेच्या प्रिया जाधव यांनी अर्ज भरला होता आणि परिवहनसाठी शेकापच्या अविनाश तावडे यांनी अर्ज भरला होता. सर्व समित्यांवर एकच अर्ज आल्याने दरवर्षीप्रमाणे निवडणूक बिनविरोध होणार हे जवळजवळ निश्चित झाले होते.
परिवहन समितीचा अर्ज नियोजित वेळेत दाखल न झाल्याने तो बाद ठरवण्यात आल्याचे समजते, तर महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतिपदासाठी एकही अर्ज न आल्याने या दोन जागी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे समोर आले आहे, तर उर्वरित पाच जागी पाचही महिला सदस्या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी भडकवाड यांनी जाहीर केले. त्यानुसार बांधकाम समितीवर राष्ट्रवादीच्या समीना जलगावकर, आरोग्य समितीवर राष्ट्रवादीच्या माधवी रीठे, नियोजन समितीवर राष्ट्रवादीच्या मेघा वाडकर, शिक्षण समितीवर राष्ट्रावादीच्या रुपाली जाधव, तसेच महिला व बालकल्याण समितीवर शिवसेनेच्या प्रिया जाधव या निवडून आल्या. तसेच पाणीपुरवठा समितीवर उपनगराध्यक्ष रमेश जाधव हे पदासिद्ध म्हणून निवडले गेले आहेत.