07 March 2021

News Flash

देशाच्या विकासासाठी महिला सबलीकरणाचे धोरण आवश्यक

स्त्रियांना जबाबदारी व अधिकार दिले तर त्या उत्तम प्रकारे काम करतात, हा अनुभव लक्षात घेता देशाच्या विकासासाठी महिलांच्या सबलीकरणाचे धोरण

| January 26, 2014 03:49 am

स्त्रियांना जबाबदारी व अधिकार दिले तर त्या उत्तम प्रकारे काम करतात, हा अनुभव लक्षात घेता देशाच्या विकासासाठी महिलांच्या सबलीकरणाचे धोरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.
केवळ महिलांसाठी शंभर खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाचा कोनशिला अनावरण समारंभ पवार यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी बोलताना स्त्री-वर्गाकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे आग्रहीपणाने सांगून पवार म्हणाले की, जगातील विकसित देशांमध्ये स्त्रियांच्या हिताची जपणूक केली जाते, निर्णय घेण्यात त्यांना सहभागी करून घेतले जाते, सर्वत्र सन्मानाची, समानतेची वागणूक दिली जाते, असे आढळून आले आहे. ज्या देशांमध्ये हे घडत नाही ते देश मागासलेले राहिले आहेत. समाजातील गरिबी व विषमता दूर करण्यासाठी, समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठी राज्यात महिला धोरणाचा स्वीकार आम्ही केला आणि त्याची चांगली फळे आज दिसत आहेत.
व्यक्तिगत जीवनातील अनुभवांचा उल्लेख करून पवारांनी, नवी पिढी घडवायची असेल तर मातेला सन्मान देण्याची आणि मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता देशाचा, समाजाचा घटक म्हणून मुलीला स्थान देण्याची गरज आग्रहाने मांडली.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना येत्या दोन वर्षांत सुमारे चौदा कोटी रुपये खर्चाचे हे रुग्णालय कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचीही या प्रसंगी भाषणे झाली.
वाळू उपसण्याचा ड्रेझर लोकार्पण
रत्नागिरी जिल्ह्य़ातील बंदरे आणि खाडय़ांमध्ये साचलेली वाळू उपसण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या ड्रेझरचा लोकार्पण सोहळा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी येथील मिरकरवाडय़ात झाला. त्याचप्रमाणे पिंजऱ्यातील मत्स्यपालनाच्या अभिनव उपक्रमाचाही शुभारंभ पवारांनी केला. माजी उपनगराध्यक्ष बशीर मुर्तूझा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवंडे यांनी राज्यातील मच्छीमारीच्या स्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठातर्फे तांत्रिक ज्ञान व बीजोत्पादनासाठी केल्या जात असलेल्या प्रयोगांची माहिती दिली. पालकमंत्री सामंत यांनी मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत ऊहापोह केला. या प्रसंगी बोलताना पवारांनी, मत्स्योत्पादनाच्या वाढीसाठी देशात अन्यत्र चालू असलेल्या प्रयोगांची मच्छीमारांनी पाहणी करावी, अशी सूचना करून त्यासाठी सर्वतोपरी साहाय्याचे आश्वासन दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 3:49 am

Web Title: women empowerment essential for nation development sharad pawar
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 भावी पिढी घडवण्याचे काम स्मारकातून व्हावे – शरद पवार
2 शिवछत्रपती पुरस्कारार्थीची शहरात मिरवणूक
3 छगन भुजबळ यांचा पोलीस यंत्रणेवर दबाव – आ. नितीन भोसले
Just Now!
X