हजारो महिलांच्या एल्गारनंतर या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली असली तरी अवैध दारूविक्रीत पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. किंबहुना, अवैध दारूचे अड्डे महिलाच चालवत असून खंजर मोहल्ला व दुर्गापुरात दारूविक्रीत महिलांचा प्रथम क्रमांक आहे. छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा व मध्यप्रदेशातूनही महिलाच दारूची तस्करी करत आहेत. दरम्यान, मध्यप्रदेशातील दहा महिलांना ५०० बाटल्या दारूसह पोलिसांनी पकडल्याने खळबळ उडाली आहे.
या जिल्ह्यात १ एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी करण्यात आली. या महिनाभराच्या कालावधीत ३५ लाखापेक्षा जास्त देशीविदेशी दारूसह ५०० आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत या अवैध दारूच्या प्रकरणात ३०० गुन्हे दाखल केले असून यात पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे.
महिलांसाठी महिलांनी छेडलेल्या जनआंदोलनातूनच ही दारूबंदी झाली आहे. मात्र, अवैध दारूविक्रीतही त्याच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. आज या शहरात शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणातून मोठय़ा प्रमाणात अवैध दारू येत आहे. यात महिलाच मोठय़ा प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. चेन्नई एक्स्प्रेसच्या माध्यमातून काल सोमवारी दारूचा मोठा साठा चंद्रपूर जिल्ह्यात महिलांच्या माध्यमातून पाठविण्यात आला. जबलपुरातील या दहा महिला बल्लारपूर रेल्वे स्थानकावर हा अवैध दारू साठा घेऊन उतरत नाही तोच पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५०० बाटल्या दारू जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, ही सर्व दारू मध्यप्रदेशातील आहे. काही दिवसांपूर्वी दुर्गापुरात गंगूबाईच्या दारू अड्डय़ावर छापा मारून पोलिसांनी तिला अटक करून लाखो रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली होती. या गंगूबाईला आतापर्यंत तीनदा अटक करण्यात आली आहे. गंगूबाईचा दुर्गापुरात दारूचा अड्डा खुलेआम सुरू आहे. विशेष म्हणजे, दारू पोहोचवण्यासाठी तिच्याकडेही खास महिला सक्रिय असल्याची माहिती आहे.
जलनगर प्रभागातील खंजर मोहल्ल्यात तर अवैध दारू व्यवसाय हा पूर्णत: महिलांच्या हातात आहे. या मोहल्ल्यात चोवीस तास खुलेआम दारू विक्री सुरू असते. तेथे पोलिसांनी एक चौकी उभारली आहे.
पोलिसांना रोज एक आरोपी द्यायचा आणि खुलेआम अवैध दारू विक्री करायची, असा करारच झाला असल्याची माहिती आहे. या मोहल्ल्यातील पुरुष केवळ देखरेख करतात आणि महिला ग्राहकांना दारूचे पार्सल देण्यापासून तर घरात चकन्यापासून सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात. लगतच्या आंध्रप्रदेश व छत्तीसगडमधून महिला अवैध मार्गाने दारू आणतात. या प्रशिक्षित महिलांनी दारू तस्करीच्या नवनवीन योजना तयार केलेल्या आहेत. काही महिला तर सकाळी मोगऱ्यांच्या फुलाचे गजरे विक्रीसाठी येतात. त्याच गजऱ्यांच्या बास्केटमध्ये दारूच्या बाटल्या पोलिसांनी नुकत्याच पकडल्या आहेत. पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी ५०० आरोपींना अटक केली आहे. यातही सुमारे ४० टक्के महिलाच आरोपी आहेत.
एकूणच अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही सक्रीय असल्याचे चित्र येथे आहे. पडोली, ताडाळी, भिवापूर, बाबुपेठ येथेही अवैध दारूचे अड्डे सुरू आहेत. किंबहुना, काही महिलांनी तर फोनवर दारूचे पार्सल उपलब्ध करून देणे सुरू केले आहे. येथे महिलांनीच दारूबंदी केली असतांना अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातही महिलाच सक्रिय दिसत आहेत.