नक्षलवादी व पोलीस दलात सलग आठ तास झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी व चातगाव क्षेत्राची सचिव रंजिता ऊर्फ रामको ऋषी उसेंडी ही ठार झाली. या वेळी पोलिसांनी एके ४७ रायफलसह नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठी जप्त केला. दुसऱ्या घटनांत नक्षलवाद्यांनी तीन आदिवासींची हत्या केल्याचे सांगितले जाते, तसेच एका वनरक्षकाचे अपहरण केले.

उपविभाग धानोराअंतर्गत पोलीस मदत केंद्र चातगाव हद्दीत मौजा हुर्रेकसाच्या जंगलात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षलवादी व पोलीस दलात चकमक झाली. शनिवारी रात्री ८ पासून ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत सलग दहा तास चाललेल्या या चकमकीत जहाल महिला नक्षलवादी तथा चारगाव एरिया सचिव रंजिता ऊर्फ रामको ऋषी उसेंडी ही ठार झाली. या वेळी पोलिसांनी घटनास्थळावरून एके ४७ रायफल, ३०३ रायफल, कॅमेरा, जिवंत काडतुसे आदी शस्त्रास्त्रे व नक्षल पुस्तके व दैनंदिन वापराचे नक्षल साहित्य जप्त केले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मुंजनाथ सिंगे, उपअधीक्षक नवनाथ ढवळे तसेच विशेष अभियान पथकाचे पोलीस अधिकारी व कमांडो यांनी अभियान केले.