येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवण्याच्या कसल्याही उपाययोजना करण्याची तसदी न घेतल्याने उन्हाळाभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. याचा त्रास महिलांना झाला. या निष्क्रियतेविरोधात मूळवंद वाडीतील सुमारे ३० महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला, तसेच ठिय्या आंदोलन केले. आंबोली ग्रामपंचायतीवर निष्क्रियतेच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार पत्रव्यवहार करून पाणी पुरवण्याबाबत कोणतीच दखल न घेतल्यामुळे घागर मोर्चा मूळवंद वाडीपासून ग्रामपंचायतीपर्यंत आधुनिक स्त्री-विकास प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विद्या सरमळकर, खजिनदार संगीता मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आला. या वेळी शीतल सरमळकर, सत्यवती गावडे, प्रभावती सरमळकर, लक्ष्मी गावडे, आरती सरमळकर यांच्यासह ३० महिलांनी घागर मोर्चा काढला. या वेळी विद्या सरमळकर म्हणाल्या की, गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही वारंवार मागणी करून का लक्ष दिले नाही? आम्ही लोकसहभागातून तात्पुरती सोय केली. दिलेल्या निवेदनांना उत्तरे का दिली जात नाहीत? उन्हाळाभर वेळ मिळत नाही यामुळे ग्रामपंचायतीची निष्क्रियता दिसून येते. काम करण्यास, तसेच सरपंच व उपसरपंच ग्रामसेवक यांना धारेवर धरले. यानंतर विद्या सरमळकर यांनीच यावर उपाययोजना सुचवली. उन्हाळाभर पाण्यासाठी वणवण करावी लागली आता मोर्चानंतर जाग येते काय? तोपर्यंत करता काय? असा सवाल उपस्थित महिलांनी केला. सहा महिन्यांपूर्वी पाणी योजनांचे प्रस्ताव देऊन ग्रामपंचायतीकडून काहीच उपाययोजना नाही. या वेळी विद्या सरमळकर यांनी आता आश्वासने नको दोन दिवसांत कार्यवाही करा व लेखी द्या, असे सांगितले.
सरपंचपद व उपसरपंचपद हे गावच्या विकासकामे करण्यासाठी आहेत. कोणाला ग्रामपंचायत खुर्चीवर बसण्यासाठी आंदण दिलेली नाही. ग्रामपंचायत आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत महिलांनी मोर्चा काढला.
या वेळी सत्ताधारी शिवसेनेच्या इतर सहा सदस्यांनी याकडे पाठ फिरवली. वर्षभरासाठीच नेमणुकांचा करार झालेला असून, सर्वाना संधी मिळायला हवी, असे नाव न छापता काही सदस्यांनी मत मांडले. निष्क्रिय कारभाराला पूर्ण बॉडीला जबाबदार ठरविता येणार नाही. याचा फटका पक्षाला बसत आहे.
ग्रामपंचायतीविरोधात हंडा मोर्चाचे निवेदन देताना विद्या सरमळकर आरती मर्गज व महिला.