गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पेंढरी पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गतील सिनभट्टीच्या जंगलात आज नक्षलवादी आणि नक्षल विरोधी अभियान राबविणाऱ्या पोलीस दलात चकमक उडाली असता एक महिला नक्षली ठार झाल्याची माहिती आहे. सदर महिला नक्षलीचा मृतदेह पोलिसांनी चकमकीनंतर केलेल्या शोध अभियानादरम्यान ताब्यात घेण्यात आला आहे.

या जंगलात नक्षल शोध अभियान सुरू आहे. आज शनिवारी दुपारी ३ ते ३:३० दरम्यानची घटना असून अभियानावर तैनाात दल मोहीम राबवित असताना अचानक जंगलातून गोळीबार झाला. प्रत्युतरादाखल सी ६० च्या कमांडोंनी नक्षल्यांचे दिशेने जोरदार फायर केले.

त्यामुळे नक्षली पळून गेले. त्यानंतर घटनास्थळाचा शोध घेतला असता एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला आहे. नक्षलविरोधी पथक तथा सी-६० पथक जंगलात शोध मोहिम राबवित आहे. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम राबविण्यात आली. दरम्यान दलम छत्तीगड आहे की महाराष्ट्र हे कळू शकले नाही.

मृत महिला नक्सलीचे नाव सृजनक्का आहे. चतगाव व कसनसूर दलमची जबाबदारी तिच्याकडे होती. नक्सलच्या विभागीय सामीतिची सदस्य होती. तिच्यावर अनेक हत्या, मारहाण, शासकीय मालमत्तेची जाळपोळ, अपहरण यासह असंख्य गुन्हे दाखल आहेत. सृजनक्काच्या मृत्यूने चळवळीला जबर धक्का बसला आहे.