पीडित महिलांविषयी संवेदना बाळगून पोलीस दलात काही महिला पोलीस अधिकारी अतिशय चांगले काम करीत आहेत. तथापि, पोलीस ठाण्यात तक्रारींची नोंद करणाऱ्या कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यांची संवेदना नष्ट झाली आहे. त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला एक महिला म्हणून आधार दिला जात नाही. यामुळे पोलीस दलात महिलांची संख्या वाढविण्याचा उद्देश सफल होताना दिसत नाही, अशी खंत राज्य महिला आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात महिलांशी संबंधित दाखल होणाऱ्या गन्ह्य़ाचे प्रमाण, समुपदेशनाची व्यवस्था व कार्य आदींचा आढावा घेण्यासाठी वाघ यांनी दोन दिवसात वाघ यांनी निफाड, सिन्नर, येवला व मालेगाव या तालुक्यातील काही पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. लासलगाव पोलीस ठाण्यात एका महिलेची तक्रार नोंदविण्यास विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडित महिलेला आपली व्यथा एकांतात मांडता येईल याची प्रत्येक पोलीस ठाण्यात व्यवस्था करण्याची मागणी वाघ यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.