आर्णी तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर शुक्रवारी, ८ मे रोजी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत तब्बल ३५ पकी ३० ग्रामपंचायतींवर सरपंच म्हणून महिलांची निवड झाल्याने ‘महिलाराज’चे चित्र निर्माण झालेले आहे.
विशेष म्हणजे, दारूबंदीसाठी या भागात महिलांनी पुढाकार घेत अनेक वेळा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सुमारे ३० ग्रामपंचायतींच्या कारभाराची चावी महिलांच्या हाती आल्याने महिलांची ताकद वाढली आहे व त्यामुळे सर्वागिण विकास होण्यास निश्चितपणे मदत होणार, अशी आशा बळावली आहे. निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बऱ्याच ठिकाणी यश संपादन करता आले असले तरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नरेश राठोड यांच्या बोरगावात काँगेसला पराभूत व्हावे लागले, तर भाजपला करिश्मा दाखविता आला नाही. पांगरी येथे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण िशदे यांनी मात्र आपल्या पक्षाला स्थान मिळवून दिले. तसेच अंबोडा येथे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी राऊत यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. पंचायत समितीच्या सभापती सुनिता राठोड यांनी महाळुंगीवर आपल्या गटाचा झेंडा फडकावून काँग्रेसला यश मिळवून दिले. देऊरवाडी (बुटले) येथे बाळासाहेब गिरी, रमेश मांगुळकर, पंडीत बुटले यांनी राजकीय अस्तित्व सिद्ध केले. शारी येथे कृ.उ.बा. समितीचे सभापती जीवन जाधव यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले, तर माजी जि.प. सदस्य अनंता गावंडे यांनी शेलु (सें.) येथे सत्ता काबीज ठेवली.