आंबोली खाकबीची राय या ठिकाणी एक मानवी सांगडा सापडला आहे. हा सांगाडा स्त्री जातीचा असून तो वर्षभरापूर्वीचा असावा, असे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी बोलताना सांगितले. आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी एक मानवी सांगाडा असल्याची खबर पोलीस पाटील प्रवीण गावडे यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर श्वानपथक घटनास्थळी पोहचले. शिवाय पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी पथकासह जाऊन पंचनामा केला. आंबोली खाकबीची राय या ठिकाणी मानवी सांगाडा असल्याची माहिती पोलीस पाटलांना मिळताच पोलीस चक्रे वेगाने फिरली. हा सांगाडा ताब्यात घेण्यात आला असून तो स्त्री जातीचा असल्याचा पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. मानवी सांगाडा महिलेचा आहे. तो जवळपास आठ महिन्यांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज उपनिरीक्षक गायकवाड यांनी व्यक्त केला. त्यांनी हा सांगाडा योग्य त्या तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविला जाईल असे सांगितले. आंबोली थंड हवेचे ठिकाण असल्याने मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात, त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यात सांगाडय़ाबाबत कळविले जाईल. त्यानंतर कोणी नातेवाईक समोर आल्यास डीएनए करण्यात येणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून सांगाडा ताब्यात घेतला, तसेच श्वानपथक मागवूनही त्याला वास घेण्यास दिला, पण सांगाडय़ाबाबत आजच्या दिवशी तपास शून्यच असल्याचे पोलिसांनी बोलताना सांगितले.