पती काहीही कामधंदा करीत नाही, उलट गरिबीला तोंड देत कसाबसा संसाराचा गाडा हाकताना त्रास देतो, त्यातच स्वत:च्या आईचा आधारही गेल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन एका महिलेने आपल्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्येचा मार्ग पत्करला. रामवाडीजवळ गंगामाई हॉस्पिटलच्या आवारात ही दुर्घटना घडली.
अंबिका दत्तात्रेय पोतराज (३२, रा. विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक २, सोलापूर) व तिचा मुलगा प्रेम (५) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत. श्याम चव्हाण (रा. मोदीखाना, सोलापूर) यांनी यासंदर्भात सदर बझार पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गंगामाई हॉस्पिटलच्या आवारातील विहिरीत एका महिलेने आपल्या मुलासह उडी टाकून आत्महत्या केल्याचे दिसून आले. नंतर मृतांची ओळख पटली. मृत अंबिका पोतराज हिचा विवाह सात वर्षांपूर्वी दत्तात्रेय पोतराज याजबरोबर झाला होता. परंतु दत्तात्रेय हा काहीही कामधंदा न करता उलट त्रास देत असे. यातच अंबिका हिच्या आईचे पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले. आईचा आधार गेल्यामुळे तिने वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 2:20 am