घटस्फोटित असलेल्या एका शिक्षिकेला ऑनलाइन वर शोधणे चांगलेच महागात पडले असून यात तिला भामट्यांनी भेटवस्तू पाठविल्याची थाप मारत तिच्याकडून चार लाख ४० हजारांची रक्कम ऑनलाईन उकळून फसवणूक केली. या गुन्ह्याची नोंद सोलापुरात जेलरोड पोलीस ठाण्यात झाली आहे.

संबंधित महिला पेशाने शिक्षिका असून घटस्फोटित आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील आयुष्यासाठी दुसरा जोडीदार निवडण्याचे ठरविले होते. त्यासाठीच त्यांनी गेल्या २१ नोव्हेंबर रोजी स्वतःच्या स्मार्ट फोनवर घटस्फोटित वधू-वर स्थळ सूचक मंडळाच्या एका ॲपवर स्वतःची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून सदस्यत्व स्वीकारले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना मोबाइलवर एका व्यक्तीने संपर्क साधून घटस्फोटित वधू-वरांविषयीची माहिती पुरविली.

नंतर त्या व्यक्तीने पुन्हा संपर्क साधून आपण भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना अनोळखी क्रमांकाने मोबाइल आला. पलिकडील व्यक्तीने स्वतःचे नाव प्रिया शर्मा असल्याचे सांगत आपण दिल्लीच्या आबकारी कर विभागातून बोलत असल्याचे नमूद करीत, तुमच्या नावाने भेटवस्तू आली असून त्यावर ३५ हजारांचा कर भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तेवढी रक्कम दिलेल्या सूचनेनुसार देवाशिश जेना या व्यक्तीच्या बँक खात्यावर पाठविली. नंतर त्यांना पुन्हा फोन आला.

पलिकडील व्यक्तीने, भेटवस्तू स्कॅन करून पाहिली असता त्यात परकीय चलन आणि सोने असल्याचे सांगत त्यापोटी दंड भरण्यास फर्मावले. दंड न भरल्यास कारवाई होण्याची भीतीही दाखविली. त्यामुळे दंड म्हणून एक लाख ८० हजारांची रक्कम त्यांनी पाठवली. परंतु त्यानंतर मागणी केल्याने पुन्हा दोन लाख २५ हजार रूपये पाठविले. परंतु भेटवस्तू येत नसल्याने त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांच्याकडे आणखी पैशाची मागणी केली गेली. त्यामुळे शेवटी हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार चारजणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद हे पुढील तपास करीत आहेत.